दिमाखदार खेळाने यजमान ब्राझीलला टक्कर देणाऱ्या चिली संघातील खेळाडूंचे प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पोली यांनी मुक्तकंठाने कौतुक केले आहे. ‘‘खेळाडूंच्या शानदार कामगिरीचा मला अभिमान आहे. चिलीच्या चाहत्यांची भूमिकाही प्रशंसनीय आहे. इतका चांगला खेळ केल्यानंतरही पराभव पदरी पडल्याचे वास्तव स्वीकारणे कठीण होते,’’ असे सॅम्पोली यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘खेळाडूंनी क्षमतेनुरूप खेळ केला. त्यांच्या खेळाची इतिहासात नक्कीच नोंद होईल. चिलीच्या नागरिकांना ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार करून देण्याची ही संधी होती.  ब्राझील जेतेपदाचा दावेदार संघ आहे, याची आम्हाला कल्पना होती. आम्ही स्पेनला नमवले होते. नेदरलँड्सला चांगली टक्कर दिली होती; परंतु पेनल्टी शूटआऊटमध्ये काय होईल याचा नेम नसतो.’’