लुईस सुआरेझच्या बंदीमुळे खचलेला उरुग्वे संघ.. सुआरेझसारख्या ‘प्लेमेकर’ आक्रमकपटूचा अभाव.. साखळी फेरीपासूनच खडतर आव्हाने.. दुसरीकडे गटात तिन्ही सामने जिंकून सर्वाचे लक्ष वेधणारा कोलंबिया.. जेम्स रॉड्रिगेझ तुफान फॉर्मात.. अशा परिस्थितीचा फायदा उठवत रॉड्रिगेझने केलेल्या दोन गोलमुळे कोलंबियाने गेल्या वेळी उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या उरुग्वेवर २-० अशी मात केली. सुआरेझपाठोपाठ उरुग्वेने मायदेशी परतण्याचे तिकीट काढले, तर कोलंबियाची स्वारी विश्वचषकात पहिल्यांदाच उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचली.
आता ४ जुलै रोजी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाची लढत यजमान ब्राझीलशी होणार आहे. पहिल्या बाद फेरीच्या सामन्यात विश्वचषकाचा दावेदार समजल्या जाणाऱ्या ब्राझीलने चिलीवर पेनल्टी-शूटआऊटमध्ये ३-२ असा थरारक विजय मिळवला होता. पण स्टार खेळाडू होण्याचा मान रॉड्रिगेझने पटकावला. रॉड्रिगेझने दोन्ही सत्रांत केलेल्या प्रत्येकी एक गोलमुळे कोलंबियाने आरामात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या कामगिरीमुळे रॉड्रिगेझने २०१४च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम गोल लगावण्याची (पाच गोल आणि चार वेळा गोलसाहाय्य) किमया साधली आहे.
उपान्त्यपूर्व फेरी
सामना क्र. ५७ : ब्राझील वि. कोलंबिया
स्थळ : इस्टाडिओ कॅस्टेलाओ, फोर्टालेझा
दिनांक : ४ जुलै
वेळ : मध्यरात्री १.३० वा.
फोर्लान निवृत्तीच्या विचारात नाही
खराब फॉर्म आणि वाढते वय, या चिंता सतावत असतानाही उरुग्वेचा आघाडीवीर दिएगो फोर्लान निवृत्त होण्याच्या विचारात नाही. २०१०च्या विश्वचषकात चाहत्यांच्या पसंतीचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या फोर्लानला गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर कोलंबियाविरुद्ध छाप पाडता आली नाही. ‘‘अजूनही फुटबॉल खेळायची माझी इच्छा आहे. मी ३५ वर्षांचा असूनही मैदानावर खेळायला मला आवडते. फुटबॉलमध्ये उरुग्वेची नवी पिढी आली असली तरी देशासाठी योगदान द्यायला मला आवडेल,’’ असे फोर्लानने सांगितले.
..तरीही सुआरेझच हिरो
उरुग्वेला बाद फेरीत पराभूत व्हावे लागले तरी लुईस सुआरेझ हाच त्यांच्यासाठी हिरो ठरला. उरुग्वेच्या ड्रेसिंगरूममध्ये तसेच डगआऊटमध्येही सुआरेझची उणीव जाणवत होती. ‘‘सामना जिंकणे किंवा हरण्यापेक्षा सुआरेझची बंदी आमच्यासाठी जास्त धक्कादायक होती,’’ असे उरुग्वेचा अनुभवी बचावपटू दिएगो लुगानो म्हणाला. सुआरेझ मायदेशी असला तरी त्याची ९ नंबरची जर्सी ड्रेसिंगरूममध्ये ठेवण्यात आली होती. चाहत्यांनी सुआरेझचा फोटो असलेला मुखवटा परिधान करून मॅराकाना स्टेडियममध्ये ‘ओले ओले ओले, सुआरेझ’ अशा घोषणा दिल्या.
रॉड्रिगेझ करिश्मा
सामन्याआधी सुआरेझच्या चार महिन्यांच्या बंदीची चर्चा सर्वत्र होत होती, पण सामना संपल्यावर सर्वाच्या मुखी जेम्स रॉड्रिगेझचे नाव होते. २२ वर्षांच्या या युवा फुटबॉलपटूने आधी २८व्या मिनिटाला व नंतर ५०व्या मिनिटाला असे दोन गोल करून उरुग्वेच्या आव्हानातील हवा काढून घेतली. छातीवर चेंडू झेलल्यानंतर गोलक्षेत्राच्या बाहेरूनच डाव्या पायाने मारलेला जोरदार फटका उरुग्वेचा गोलरक्षक फर्नाडो मुसलेराला चकवून गोलजाळ्यात गेला. पाबलो आर्मेरोनंतर जुआन कुआड्राडोकडून चेंडू मिळवल्यानंतर गोलजाळ्यासमोरच उभ्या असलेल्या रॉड्रिगेझने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच दुसरा गोल केला. सुआरेझशिवाय खेळणाऱ्या उरुग्वेला या सामन्यात प्रभाव पाडता आला नाही.