जर्गन क्लिन्समन हे शांत स्वभावी. ‘ट्विटर’वरही ते कधी राग व्यक्त करताना दिसत नाहीत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही सौम्य भाषेत उत्तरे देतात. १९९० साली इटलीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पश्चिम जर्मनीच्या क्लिन्समन यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी अर्जेटिनाच्या प्रेडो मोंझोन यांना रेफरींनी मैदानाबाहेर काढले होते. त्या वेळीही क्लिन्समन शांत होते. हा प्रसंग जर्मनीला तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकून देणारा ठरला. आता कॅलिफोर्नियात राहणारे ४९ वर्षीय क्लिन्समन हे पक्के अमेरिकनवासी झालेत. तुम्ही कसे आहात? असे अमेरिकेतल्या कुणीही विचारले तर त्यांचे एकच उत्तर असते, ‘‘फॅण्टास्टिक!’’
आता गुरुवारी होणाऱ्या सामन्यात क्लिन्समन यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिका जर्मनीशी भिडणार आहे. त्यामुळे जबाबदारीला प्राधान्य द्यायचे की राष्ट्राला, असा प्रश्न क्लिन्समन यांच्यासमोर निर्माण होणे स्वाभाविक आहे. मैदानावर विचार करून आक्रमक खेळ करण्याची जर्मनीची वृत्ती क्लिन्समन यांनी अमेरिकेला शिकवली. आता त्याच जर्मनी संघाविरुद्ध अमेरिकेला मुकाबला करायचा आहे. ‘‘फुटबॉलमध्ये युरोपीयन देशांपेक्षा अमेरिका संघ यशस्वी ठरलेला नाही. आता युरोपमधील क्लिन्समन यांच्याकडूनच आम्ही अपेक्षा बाळगून आहोत,’’ असे अमेरिकेचा गोलरक्षक टिम हॉवर्डने याआधीच सांगत होता. रविवारी पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात जर्मनी आणि घानाचा समावेश असलेल्या ‘ग’ गटातून बाद फेरीसाठी पात्र ठरणारा अमेरिका हा पहिला संघ ठरणार होता. पण सामना संपायला ३० मिनिटे शिल्लक असताना ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या सुरेख पासवर पोर्तुगालने सामना बरोबरीत सोडवला आणि अमेरिकेचे बाद फेरीतील भवितव्य टांगणीला लावले. २०११मध्ये अमेरिकेच्या करारावर सह्य़ा केल्यानंतर क्लिन्समन यांनी आपल्या कल्पकतेमुळे अमेरिकेला बाद फेरीच्या आशा दाखवल्या.
२००६मध्ये जर्मनीला मायदेशात विश्वचषक जिंकून देण्याचे एकमेव उद्दिष्ट क्लिन्समन यांच्यासमोर ठेवण्यात आले. आपल्या निर्णयांमध्ये कुणीही हस्तक्षेप करू नये, ही एकमेव अट त्यांनी जर्मन फुटबॉल असोसिएशनसमोर ठेवली. २००२च्या विश्वचषकातील ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार विजेता गोलरक्षक आणि संघातील सर्वात अनुभवी खेळाडू ऑलिव्हर कानला वगळल्यानंतर सर्वानीच क्लिन्समन यांच्यावर कडाडून टीका केली. पण जर्मनीच्या युवा संघाला त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारून दिली. त्या वेळी अतिरिक्त वेळेत जर्मनीला इटलीकडून निसटता पराभव पत्करावा लागला. त्या वेळी क्लिन्समन यांनी संधी दिलेले जर्मनीचे युवा शिलेदार हे २०१४च्या जर्मनीच्या संघाचे प्रमुख भाग बनले आहेत. फिलिप लॅम, बास्तियन श्वाइनस्टायगर, पेर मेर्टेसॅकर आणि लुकास पोडोलस्की ही त्यांच्यापैकीच काही नावे.
विश्वचषकाच्या पात्रता फेरीसाठी क्लिन्समन यांनी अमेरिका संघातून वरिष्ठ खेळाडूंना डच्चू दिला. अमेरिकेसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या लँडन डोनोव्हॅनला डच्चू देऊन त्यांनी १९ वर्षीय ज्युलियन ग्रीनला ‘हिरवा’ कंदील दाखवला. त्यांच्यावर कान प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. पण त्यानंतर अमेरिकेने १२ सामने जिंकण्याचा विक्रम करत ब्राझीलचे तिकीट निश्चित केले. आता त्यांच्यासमोर आव्हान असेल ते अमेरिकेला बाद फेरीत पोहोचवण्याचे. पण या वेळी त्यांचा मुकाबला असेल तो आपल्या जन्मदात्या जर्मनीशी.