जर्मनी आणि फ्रान्स हे दोन्ही युरोपमधील बलाढय़ संघ. मॅराकानासारखे ऐतिहासिक स्टेडियम या महामुकाबल्याचे व्यासपीठ आहे. दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिले आहेत. फ्रान्सच्या नावावर एक तर जर्मनीने तीनदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. याशिवाय जर्मनीने तब्बल १५ वेळा तर फ्रान्स सात वेळा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. अशा या दिग्गज महासत्तांमध्ये आता उपांत्य फेरीत मजल मारण्यासाठी जबरदस्त महायुद्ध रंगणार आहे.
बाद फेरीचा अडथळा पार केल्यानंतर फ्रान्सने दोन वेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता शुक्रवारी जर्मनीविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून तीच परंपरा कायम राखण्याचा फ्रान्सचा प्रयत्न असेल. मात्र सलग चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठण्यासाठी जर्मनीचा संघ उत्सुक आहे. प्रशिक्षक दिदियर देसचॅम्प्स यांना दुखापतींची चिंता नसलेल्या २३ जणांमधून ११ खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. मात्र जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लो यांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यांचे सात खेळाडू आजाराने त्रस्त आहेत. तसेच श्कोड्रान मस्तफी याने मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्पर्धेतूनच माघार घेतली आहे. त्याचबरोबर मॅट्स हमेल्स हा दुखापतीतून सावरला आहे.
बाद फेरीत फ्रान्स आणि जर्मनी या दोन्ही संघांना अतिरिक्त वेळेत विजय मिळवता आले होते. दोन्ही संघांसाठी ही धोक्याची घंटा असेल. फ्रान्सने साखळी फेरीत होंडुरास आणि स्वित्र्झलडवर विजय मिळवून इक्वेडोरविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला होता. जर्मनीने प्राथमिक फेरीत पोर्तुगाल आणि अमेरिकेवर मात करून घानाविरुद्ध बरोबरी पत्करली होती. साखळी फेरीत फ्रान्सने प्रभावी कामगिरी केली होती. अन्य ३१ संघांच्या तुलनेत फ्रान्सने सर्वाधिक २६ वेळा गोल करण्याचे प्रयत्न केले होते. करिम बेंझेमाने फ्रान्ससाठी सर्वाधिक तीन गोल केले असून त्याच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
जर्मनीकडून थॉमस म्युलर हा आतापर्यंत सर्वाधिक यशस्वी आक्रमकवीर ठरला आहे. चार गोल झळकावणारा म्युलर अल्जेरियाविरुद्धच्या बाद फेरीत मात्र निष्प्रभ ठरला. अल्जेरियाचा गोलरक्षक रायस बोल्ही याच्या अप्रतिम कामगिरीमुळे जर्मनीच्या आघाडीवीरांना अनेक संधी असतानाही गोल करता आले नव्हते. म्युलर, मेसूत ओझिल आणि मारिओ गोएट्झे हे तीन आक्रमकवीर प्रतिस्पध्र्याची बचावफळी भेदू शकले नव्हते. अखेर आंद्रे स्करल आणि ओझिल यांनी अतिरिक्त वेळेत गोल करत जर्मनीच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे जोकिम लो यांना याबाबतीत नवी रणनीती आखावी लागणार आहे. मोठय़ा स्पर्धामध्ये खेळण्याचा गाढा अनुभव पाहता, सलग नऊ वेळा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या जर्मनीचे या सामन्यात पारडे जड असेल.
जर्मनीचे सात खेळाडू तापाने आजारी
फ्रान्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याआधी जर्मनीचे सात खेळाडू तापाने फणफणल्यामुळे प्रशिक्षक जोकिम लो यांच्यापुढील चिंतेत भर पडली आहे. ‘जर्मनीची गोलमशीन’ थॉमस म्युलर, ख्रिस्तोफ क्रॅमर आणि मॅट हमेल्स यांचा त्यात समावेश आहे. ‘‘सात खेळाडूंना तापाची लागण झाली आहे. वातावरणातील बदल, प्रवास आणि वातानुकूलित यंत्रणा यामुळे हे घडले आहे. हे वाईट असले तरी त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. परिस्थिती आटोक्यात येईल, अशी आशा आहे,’’ असे जोकिम लो यांनी सांगितले.
१९८२चा तो ऐतिहासिक सामना..
१९८२च्या उपांत्य फेरीत पश्चिम जर्मनीची लढत मायकेल प्लॅटिनी यांच्या फ्रान्सशी होती. पेनल्टी शूटआऊटआधी ३-३ अशी स्थिती होती. पण दुसऱ्या सत्रात फुटबॉलला कलंक लागेल, असे घडले होते. जर्मनीच्या गोलक्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवताना जर्मनीचा गोलरक्षक हॅराल्ड शूमाकरने फ्रान्सच्या पॅट्रिक बॅटिस्टनला धडक देऊन मैदानावर पाडले होते. बॅटिस्टनला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. पण त्याचे दोन दात, तीन बरगडय़ा आणि डाव्या बाजूचे हाड शूमाकरने मोडले होते. जवळपास ३० मिनिटे बॅटिस्टन बेशुद्धावस्थेत होता, त्यानंतर तो कोमात गेला होता. फ्रान्स, जर्मनी हे संघ एकमेकांसमोर येतात, त्या वेळी ही घटना डोळ्यासमोर लख्ख आठवते.सामना क्र. ५८
जर्मनी वि. फ्रान्स
स्थळ : मॅराकाना स्टेडियम, रिओ दी जानिरो ल्ल वेळ : रात्री ९.३० वा.पासून
मॅच फॅक्ट्स
जर्मनी :
*फिफा विश्वचषकातील गेल्या १५ सामन्यांत जर्मनीने एकही सामना गमावलेला नाही.
*जर्मनीने विश्वचषकातील गेल्या आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवले आहे.
फ्रान्स :
*फ्रान्सने विश्वचषकातील गेल्या सात सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये निर्विवाद यश संपादन केले आहे.
*फ्रान्सचा संघ विश्वचषकातील गेल्या पाच सामन्यांत अपराजित राहिला आहे.
गोलपोस्ट
जर्मनीचे बरेचसे खेळाडू मोठय़ा क्लबकडून खेळतात. त्यातील बरेचसे खेळाडू हे बायर्न म्युनिकचे प्रतिनिधित्व करतात. दडपण कसे झुगारायचे, हे जर्मनीला पक्के ठाऊक आहे. मागील दोन स्पर्धामध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या जर्मनीला कडवी लढत देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
– दिदियर देसचॅम्प्स, फ्रान्सचे प्रशिक्षक
सर्वानाच आमच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. आम्ही ब्राझीलमध्ये फक्त सहभागी होण्यासाठी आलो नसून विश्वचषकाचे जेतेपद हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. मैदानावर लढताना आम्हाला कोणतेही दडपण जाणवत नाही. फ्रान्स हा आमचा शेजारी आणि कट्टर प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे ही लढत उत्कंठावर्धक होणार, यात शंका नाही.
आंद्रे स्करल, जर्मनीचा खेळाडू