जॅक्सन मार्टिनेझच्या दुहेरी धमाक्यामुळे कोलंबियाला जपानचे आव्हान ४-१ असे नेस्तनाबूत करता आले. कोलंबियाने सलग तिसऱ्या विजयासह ‘क’ गटातून गटविजेत्याच्या थाटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर फक्त एका गुणासह आशियाई विजेत्या जपानच्या संघाने आपला गाशा गुंडाळला.
फॅरिड माँड्रॅगनने रॉजर मिलाचा फिफा विश्वचषकातील सर्वात जास्त वयाच्या खेळाडूचा विक्रम मोडीत काढल्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते.  आक्रमणवीर ज्युआन क्वाड्रॅडोने १७व्या मिनिटाला जपानचा गोलरक्षक इजी कावाशिमाला चकवून कोलंबियाचे खाते उघडले. जपानचा आक्रमणवीर शिनजी ओकाझाकीने ३५व्या मिनिटाला गोल साकारण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले, पंरतु पहिल्या सत्रातील भरपाई वेळेत त्याने सुरेख हेडरद्वारे संघाला बरोबरी साधून दिली.
दुसऱ्या सत्रात जॅक्सन मार्टिनेझने कमाल केली. ५५व्या आणि ८२व्या मिनिटाला आणखी दोन गोलची भर त्याने घातली. मग उत्तरार्धात जेम्स रॉड्रिग्झने कोलंबियाची गोलसंख्या चापर्यंत नेली.