साखळीतील शेवटचे सामने गुरुवारी खेळवले जातील आणि साधारणत: कोण स्पर्धेत टिकून आहे, हे स्पष्ट होईल. आतापर्यंत सट्टाबाजारात जी उलाढाल झाली, ती यापुढील सामन्यांत आणखी वाढणार आहे. मंगळवारी झालेल्या इटली आणि उरुग्वे यांच्यातील सामन्यात उरुग्वेने बाजी मारली. दोन्ही संघ तुल्यबळ होते. त्यामुळे दोघांना समान भाव होता. परिणामी, सट्टेबाजारात काहीच उलाढाल झाली नाही. मात्र सामना अनिर्णीत राहिला असता तर कदाचित सट्टेबाजांना फटका बसला असता. शेवटच्या फेरीतील सामन्यांमुळे एकूण गुणफलकावर किंवा संघांच्या अग्रक्रमावर फारसा फरक पडणार नसला तरी पंटर्सना पोर्तुगाल-घाना या सामन्यात अधिक रस आहे. सट्टेबाजांनी अर्थातच पोर्तुगालच्या बाजूने कौल दिला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा आपला चमत्कार दाखवेल, असे भारतीय सट्टेबाजांना वाटत आहे. त्यामुळे त्याच्यावर चांगला भाव देऊ करण्यात आला आहे. रोनाल्डो या सामन्यात अधिक गोल करील, यासाठी ७० पैसे देऊ करण्यात आले आहेत. मंगळवारी झालेल्या सामन्यांचे निकाल सट्टेबाजांच्या अपेक्षेप्रमाणे आले. आता शुक्रवारी विश्रांती घेऊन शनिवारपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. सट्टेबाजही त्यात व्यस्त झाले आहेत. आता सट्टाबाजारात जोरदार उलाढाल होईल, असे त्यांना वाटत आहे. आता गोलकर्त्यां नेयमार, थॉमस म्युलर, रॉबिन व्हॅन पर्सी, आर्येन रॉबेन आदींचे राज्य सुरू होणार आहे. भारतीय सट्टाबाजाराने आता रोनाल्डोला डच्चू दिला असून नेयमार आणि म्युलर हेच आघाडीवर आहेत.
आजचा भाव :
पोर्तुगाल घाना
५५ पैसे (५/४) दोन रुपये (२३/१०)
अमेरिका जर्मनी
पाच ते आठ रु. (२१/२) १५ पैसे (४/१३)
अल्जेरिया रशिया
६५ पैसे (२९/१०) एक रुपया (१५/१३)
दक्षिण कोरिया बेल्जियम
तीन रुपये (४/१) ८० पैसे (१३/१५)
निषाद अंधेरीवाला
वय इथले संपत नाही!
विश्वचषकासारख्या फुटबॉलच्या महाकुंभात विक्रमांचीसुद्धा जंत्री असते. यंदाच्या विश्वचषक स्पध्रेत फॅरिड माँड्रॅगन या कोलंबियाच्या गोलरक्षकाने आपलेही स्थान अधोरेखित केले आहे. फक्त सहा मिनिटांसाठी मैदानावर अवतरलेल्या माँड्रॅगनने विश्वचषक स्पध्रेत खेळणाऱ्या सर्वात वयस्कर फुटबॉलपटूचा विक्रम साकारला. फुटबॉलरसिकांनी त्याच्या विक्रमाला यथोचित दाद दिली. कोलंबियाचा संघ ३-१ असा आघाडीवर असताना अनुभवी गोलरक्षक माँड्रॅगनला प्रशिक्षक जोस पेकेरमन यांनी मैदानावर पाचारण केले. ४३ वष्रे आणि तीन दिवस वयोमान असलेल्या माँड्रॅगन यांनी कॅमेरूनच्या रॉजर मिलाचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषकातील ४२ वष्रे ३९ दिवस वयोमानाचा विक्रम मिलाच्या नावावर होता. ‘‘माझ्या प्रदीर्घ कारकिर्दीतील हा सर्वोत्तम क्षण आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मी अतिशय आभारी आहे. या सामन्याचा चेंडू मी माझ्या खासगी संग्रहालयात ठेवणार आहे.’’
– माँड्रॅगन
कशी नशिबाने थट्टा आज मांडली..
कोलंबियाकडून हार पत्करल्यानंतर जपानचे पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे हा जपानी चाहता भावविवश झाला होता. युतो नागाटोमोचा मुखवटा धारण केलेल्या या फुटबॉलरसिकाने टोकियोच्या रस्त्यावरच अशा प्रकारे आपले नैराश्य प्रकट केले.