रेफ्रींच्या शिट्टीने खेळाला सुरुवात होते, कुठेही गडबड झाली की पुन्हा त्याची शिट्टी सक्रिय होते आणि त्याच्या पल्लेदार शिट्टीनंतरच सामन्याचा शेवट होतो. ‘लाथाळ्यांचा खेळ’ अशी हिंसक उपाधी मिळालेल्या फुटबॉल सामन्याचा निर्णयाधिकारी म्हणजे रेफ्री. अन्य खेळांमध्ये पंचांना किंवा सामनाधिकाऱ्यांना तुलनेने बैठय़ा स्वरूपाचे काम असते, पण फुटबॉलची गोष्टच निराळी. खेळाडूंप्रमाणे किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त पळायचे आणि पळता-पळता अचूक निर्णयांसह सामना नियंत्रणात ठेवण्याची दुहेरी जबाबदारी सांभाळायची. फुटबॉलसारख्या वेगवान आणि धसमुसळ्या खेळात नक्की कोणी हेडर केला, कोणी कोणाला धक्का दिला, ऑफसाइडचा नियम पाळला की नाही, ही सगळी कसरत दीड तास पळता-पळता सांभाळण्याचे खडतर आव्हान ही मंडळी पेलतात.
लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार, रॉबिन व्हॅन पर्सीच्या गोलची चर्चा जगभर होते, परंतु ९० मिनिटे पळून नियमांबरहुकूम सामन्यावर पूर्णत: नियंत्रण करणारा रेफ्री मात्र उपेक्षितच राहतो. त्यांच्या नावाची चर्चा होते, पण जेव्हा ते चुकतात तेव्हाच. त्यांचा एखादा निर्णय सामन्याला कलाटणी देऊ शकतो, परंतु त्यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता चूक होण्याची शक्यता जास्तच असते. टीव्हीवर रिप्लेमध्ये स्लो मोशनमध्ये आपल्याला नेमके काय घडले आहे, हे कळते. पण रेफ्रींना आजूबाजूच्या गदारोळात आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवून निर्णय द्यायचा असतो. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकाच्या महासोहळ्यात प्रत्येक संघाचा मोठा ताफा दाखल झाला आहे, हजारोंच्या संख्येने चाहतेही जमले आहेत. पण रेफ्रींची संख्या फक्त ३३ आहे. यावरून त्यांच्यावरच्या जबाबदारीची जाणीव होईल. या मंडळींच्या साथीला साहाय्यक रेफ्रींची फौज आहे. दोन वेळा वर्षांतील सर्वोत्तम रेफ्रींचा पुरस्कार पटकावणारे इंग्लंडचे हॉवर्ड वेब, इराणचे अलिरेझा फाघानी, सर्बियाचे मिलोरॅड मॅझिक यांच्यासह आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा प्रदीर्घ अनुभव असणारी मंडळी ब्राझीलमध्ये आहेत. मात्र सामने सुरळीत होत असताना त्यांना प्रसिद्धी मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र अर्जेटिनाविरुद्ध इराणला पेनल्टी न देण्याच्या मुद्दय़ावरून रेफ्री मिलोरॅड मॅझिक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जसजसा विश्वचषकाचा थरार वाढत जाईल, तशी रेफ्रींची भूमिका कठीण होत जाणार आहे.
खेळाडूंच्या तंदुरुस्तीची, त्यांच्या सरावाची सातत्याने चर्चा होते. मात्र आंतरराष्ट्रीय रेफ्री एका सामन्यात ८ ते १२ मैल पळतो. सामना अतिरिक्त वेळेत किंवा पेनल्टी शूटआऊटमध्ये गेल्यास या वेळेत भरच पडते. इतके धावण्यासाठी अफाट तंदुरुस्ती लागते. हृदय, पाय विशेषत्वाने आणि पर्यायाने संपूर्ण शरीर तंदुरुस्त असणे या मंडळींसाठी अनिवार्य आहे. ही मंडळी ताशी सरासरी २०.७ किमी या वेगाने पळतात आणि हा आकडा फुटबॉलपटूंच्या धावण्याच्या आकडय़ांपासून फार लांबचा नाही. यामुळेच रेफ्री खेळाडूंप्रमाणे दररोज तीन-चार तासांचा सराव करतात. सतत पळताना त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती मिनिटाला १५०-१६० एवढी होते, जे सामान्य व्यक्तींच्या (९०-१३०) या प्रमाणापेक्षा जास्त असते. त्यामुळे त्यांना या अवयवाची विशेष काळजी घ्यावी लागते. खेळाडूंप्रमाणेच त्यांना पोषक आहार अत्यावश्यक असतो. कोणतीही दुखापत त्यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम करू शकते. कारण रेफ्रींवर २२ खेळाडूंना नियंत्रित करण्याचे आव्हान असते.
फुटबॉलचे स्वरूप आक्रमक आहे. धक्काबुक्की, पाडणे, चावा घेणे, ढकलाढकली सातत्याने होते. एवढय़ा गोंधळात नक्की दोषी कोण आहे, हे ठरवण्यासाठी दृष्टी भेदक लागते आणि त्याच वेळी नियम मोडणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्यासाठी कणखरता लागते. खेळाडू कितीही मोठा असला तरी त्याने चूक केली तर त्याला शिक्षा सुनावण्याची कठोर कामगिरी रेफ्रींना बजावावी लागते. प्रेक्षकांना चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा असतो, त्यामुळे अनेकदा चाहत्यांनी उडवलेली हुर्योही त्यांना सहन करावी लागते. खेळातल्या बदलानुसार रेफ्रींचे कामही विकसित झाले आहे. अन्य पंचांशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे ईअरफोन असतो. नाणफेकीसाठी नाणे आणि शिट्टी हे त्यांचे अविभाज्य घटक आहेत. पिवळे आणि लाल कार्ड ही रेफ्रींची प्रमुख अस्त्रे. ठळक घटनांची नोंद ठेवण्यासाठी कागद आणि पेनही असतो. गोलरेषा तंत्रज्ञानाच्या आगमनाबरोबर रेफ्रींना गोल झाल्याची सूचना देणारे घडय़ाळासारखे एक उपकरणही देण्यात आले आहे. याशिवाय खेळाडूंसाठी लक्ष्मणरेषा आखणारे मॅजिक स्प्रेसुद्धा या विश्वचषकात रेफ्रींना देण्यात आले आहे. हा सगळा सरंजाम बाळगून वावरणे सोपे व्हावे यासाठी रेफ्री खेळाडूंसारखीच जर्सी परिधान करतात. खेळाडूंच्या जर्सीच्या रंगाशी साधम्र्य होऊ नये यासाठी त्यांच्या जर्सीचा रंग काळा असतो.
फिफाच्या संविधानाप्रमाणे रेफ्रींसाठी अधिकार आणि कर्तव्ये यांची एक सूची तयार करण्यात आली आहे. खेळाचे नियम, फ्री किक, पेनल्टी किक, ऑफसाइड, शिक्षांचे प्रकार अशा विविध विषयांचा यात समावेश आहे. या सगळ्यांचे पालन करणे रेफ्रींसाठी अत्यावश्यक असते. रेफ्रींच्या कामगिरीचे मूल्यमापन तपासण्यासाठी फिफाचे स्वतंत्र पथक आहे. दरवर्षी हे पथक रेफ्रींच्या कामगिरीचा आढावा घेते आणि त्यानुसार पुढच्या कामाची वर्गवारी करण्यात येते. रेफ्री म्हणून काम करण्यासाठी फिफाची खडतर शारीरिक चाचणी पार करावी लागते. वेगवान कामासाठी रेफ्रीला समाधानकारक मोबदला दिला जातो, मात्र खेळाडूंना मिळणाऱ्या विक्रमी कराराच्या तुलनेत तो नाममात्रच असतो.
रेफ्री सामने निश्चित करीत असल्याचा सनसनाटी आरोप घानातर्फे करण्यात आला आहे. या प्रकरणी फिफाने अधिकृतपणे भूमिका मांडलेली नाही. जिंकण्याच्या ईष्र्येसाठी वाट्टेल तो मार्ग अवलंबणाऱ्या खेळाडूंना रोखण्यासाठी एक माणूस पुरेसा आहे का? यावरही मंथन सुरू झाले आहे. त्याला मदत करण्यासाठी आणखी काही तंत्रकुशल मार्ग अवलंबता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. चांगल्या आयोजनासाठी रेफ्रींना प्रसिद्धी मिळाल्यास ते या विश्वचषकाचे फलित असेल.
पराग फाटक