‘बलून डी’ऑर’ अर्थात फिफातर्फे देण्यात येणाऱ्या वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची नावे चर्चेत होती. बाकी संघांचे खेळाडूही जेतेपदाच्या शर्यतीत होते. मात्र खरा मुकाबला रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यातच होता. रिअल माद्रिदसाठी यंदाच्या हंगामात दमदार प्रदर्शन करणाऱ्या रोनाल्डोनेच या पुरस्कारावर नाव कोरले. जगभरातल्या मेस्सीचाहत्यांची यामुळे निराशा झाली. त्यांनी फिफावर टीकाही केली. मात्र स्वत: मेस्सीने याबाबत चकार शब्दही काढला नाही. पुरस्कार मिळाला नाही म्हणून निराश होण्यापेक्षा त्याने खिलाडूवृत्तीने रोनाल्डोचे अभिनंदन केले. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी विश्वचषकाचे व्यासपीठ त्याला खुणावत होते. वाचाळपणा करण्यापेक्षा मेस्सीने स्वबळावर अर्जेटिनाला बाद फेरीत नेले.
दर्जा श्रेष्ठ असला की खेळाडू काय किमया घडवू शकतो, याचा प्रत्यय मेस्सीने घडवला आहे. तो अगदी सहजपणे खेळतो आहे. प्रतिस्पर्धी कितीही तगडा संघ असला तरी त्याचे कोणतेही दडपण मेस्सीवर नाही. यातच त्याच्या यशाचे रहस्य दडले आहे. रोनाल्डो म्हणजे पोर्तुगाल आणि मेस्सी म्हणजे अर्जेटिना असे समीकरण विश्वचषकाआधीपासून चर्चेत होते. रोनाल्डो स्वबळावर पोर्तुगालला यश मिळवून देऊ शकलेला नाही, परंतु मेस्सीने अर्जेटिनाला बाद फेरीत स्थान मिळवून दिले आहे. श्रेष्ठ कोण? याचा फैसला मेस्सीनेच सोडवला आहे. रोनाल्डोला साहाय्य करू शकणाऱ्या खेळाडूंची कमतरता आहे. दुसरीकडे मेस्सीला गोन्झालो हिग्युएन, सर्जिओ अॅग्युरो, अँजेल डी मारिया अशा सहकाऱ्यांची साथ लाभली आहे. चेंडू खेळवत मेस्सीला दिला की तो त्याच्या अद्भुत क्षमतेच्या जोरावर अफलातून गोल झळकावतो. बाकीच्या खेळाडूंनी प्रतिस्पध्र्याचे चक्रव्यूह भेदत चेंडू मेस्सीला पुरवायचा, उरलेली मोहीम फत्ते करण्यासाठी मेस्सी समर्थ आहे. बाकीचे खेळाडू एखाद्या ठिकाणी कमी पडतात, त्यांच्या खेळातली अचूकता कमी होते, मात्र मेस्सी सातत्याने त्याच सहजतेने खेळतो आहे.
दिएगो मॅराडोना यांनी अर्जेटिनाचे विश्वचषक पटकावण्याचे स्वप्न साकारले. किमयागार मॅराडोना या विश्वविजयाचे शिल्पकार होते. मॅराडोना, पेले यांच्याकडे जगाला दाखवण्यासाठी विश्वचषक आहे. मात्र माझ्याकडे तो नाही़, अशी खंत मेस्सीने बोलून दाखवली होती. ही खंत दूर करण्याचा मेस्सीचा पुरेपूर प्रयत्न आहे. अन्य खेळाडूंचे साहाय्य मिळो अथवा न मिळो, सातत्याने गोल करायचेच, असा विडा मेस्सीने उचलला आहे. नायजेरियाविरुद्ध त्याने केलेला दुसरा गोल विस्मयकारक असाच होता. डाव्या पायाने हलकी किक लगावत त्याने नायजेरियाच्या पाच ते सहा बचावपटूंना भेदले. त्यानंतर चेंडू गोलरक्षकाच्या डावीकडे फिरला. त्यानंतर चेंडू खालच्या दिशेने सरकला आणि गोलपोस्टमध्ये गेला. जगातल्या सर्वोत्तम गोलरक्षकांमध्ये नायजेरियाचा गोलरक्षक व्हिक्टर एनयेमाचा समावेश होतो. मात्र मेस्सीचा हा गोल अडवण्यासाठी असमर्थ होतो, अशी त्याची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. आक्रमक, धसमुसळ्या, गोंधळ-गडबडीपेक्षा शैलीदार, कलात्मक खेळाची मेजवानी मेस्सीने या गोलद्वारे चाहत्यांना दिली. रोनाल्डो अद्यापही चाचपडत असताना मेस्सी मात्र सातत्याने चांगला खेळतोय. यंदा त्याला दुखापतींनी सतावले होते. पुनरागमनानंतरही तो पुन्हा दुखापतींच्या गर्तेत अडकला होता. मात्र विश्वचषकापूर्वी योग्य वेळेत तो तंदुरुस्त झाला. नायजेरियाविरुद्धचा दुसरा गोल हा त्याच्या तंदुरुस्तीचे आणि अथक परिश्रमाचे प्रतीक आहे. चेंडूला कोणती दिशा द्यायची, कधी जोरदार पद्धतीने मारायचा अशा विविध पैलूंचा मेस्सीचा अभ्यास दांडगा असल्याचे सिद्ध होते. अर्जेटिनाने बाद फेरी गाठली आहे. आता त्यांच्यासमोर खडतर संघांचे आव्हान असणार आहे. अर्जेटिनाचा संघ चमत्कार घडवू शकतो, अशी आशा सर्वानाच वाटत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2014 रोजी प्रकाशित
मेस्सी जैसा कोई नहीं..
‘बलून डी’ऑर’ अर्थात फिफातर्फे देण्यात येणाऱ्या वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची नावे चर्चेत होती.
First published on: 27-06-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2014 messi magic helps argentina