विश्वचषकाचा पहिला टप्पा आटोपला आहे. जगातल्या सर्वोत्तम ३२ संघांमधून १६ संघांनी विश्वचषकातील पहिला अडथळा पार करत बाद फेरी गाठली आहे. गटवार लढतीत चुकायला संधी असते, प्रयोग करता येतात, मात्र बाद फेरीत एक चूक स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आणू शकते. त्यामुळे ‘करो या मरो’ असा हा मुकाबला आहे. नेदरलँड्स आणि मेक्सिको बाद फेरीत आमनेसामने उभे ठाकले आहेत. बाद फेरीच्या रंगतदार मुकाबल्यांपैकी हा एक आहे. आर्येन रॉबेन आणि रॉबिन व्हॅन पर्सी या दोन खेळाडूंच्या बळावर नेदरलँड्सने दिमाखात बाद फेरी गाठली आहे. आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ हे त्यांच्या खेळाचे वैशिष्टय़ राहिले आहे. सातत्याने गोल करण्याच्या क्षमतेमुळे रॉबेन आणि व्हॅन पर्सी मेक्सिकोसाठी डोकेदुखी ठरू शकतात. सलग दोन सामन्यांत पिवळे कार्ड मिळाल्याने व्हॅन पर्सीला शेवटची लढत खेळता आली नव्हती. मेक्सिकोविरुद्धच्या लढतीत तो दमदार पुनरागमन करणार आहे. दुसरीकडे रॉबेनला शेवटच्या सामन्यात पिवळे कार्ड दाखवण्यात आले होते. मेक्सिकोविरुद्ध दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यास त्याला पुढच्या लढतीत खेळता येणार नाही. त्यामुळे या सामन्यात रॉबेन सावधपणे खेळायची शक्यता आहे. अंतिम आठमध्ये आगेकूच केल्यास तो मुकाबला न खेळता येण्याचा धोका रॉबेन आणि नेदरलँड्स संघ व्यवस्थापन पत्करण्याची शक्यता नाही. या जोडगोळीला रोखण्याचे अवघड आव्हान मेक्सिकोसमोर आहे. मेक्सिकोचा संघ नेदरलँड्सच्या तुलनेत लहान वाटत आहे. मात्र यजमान ब्राझीलविरुद्ध किंवा कॅमेरुनविरुद्ध त्यांनी ज्या पद्धतीने खेळ केला आहे ते प्रशंसनीय आहे. दमदार संघांचे आक्रमण रोखण्यासाठी त्यांचा गोलरक्षक आणि बचावफळी सक्षम आहे. त्याच वेळी गोल करण्यातही त्यांचे खेळाडू वाकबगार आहेत. विश्वचषकासाठी बरेच दिवसआधी ब्राझीलमध्ये दाखल होत त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. विश्वचषकाचे जेतेपद आपल्याकडे असावे, अशी प्रत्येक संघाची इच्छा आहे. मात्र त्यासाठी प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळ करत छोटय़ा गोष्टी अचूकतेने करण्यावर भर देणे अत्यावश्यक आहे. नेदरलँड्स आणि मेक्सिकोच्या मुकाबल्यात नेदरलँड्सचे पारडे जड मानले जाते आहे; परंतु प्रत्यक्षात मेक्सिकोही आश्चर्यकारक निकालाची नोंद करू शकते. स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि चिली अशा तीन चांगल्या संघांना नमवत अपराजित राहत बाद फेरीत आल्यामुळे नेदरलँड्सचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. देश असो किंवा क्लब, त्यांच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. दुसरीकडे मेक्सिकोचा संघ युवा आहे. त्यांच्याकडे अमर्याद ऊर्जा आहे. या ऊर्जेला मेहनतीची आणि नशिबाची साथ मिळणे आवश्यक आहे. आक्रमणावर भर देणाऱ्या नेदरलँड्सचा वारू रोखण्याची ताकद मेक्सिकोच्या खेळाडूंमध्ये आहे. मात्र मोठय़ा स्पर्धाच्या व्यासपीठावर खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे नाही. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये नेदरलँड्सच्या सामन्यांना चाहते अलोट गर्दी करत असल्याचे चित्र आहे. मेक्सिको उत्तर अमेरिकेतला देश आहे. त्यामुळे ब्राझीलप्रमाणे त्यांनाही जोरदार पाठिंबा आहे. दडपणाच्या क्षणी संयम राखत कोण सर्वोत्तम खेळ करू शकतो यावरच विजेता ठरणार आहे. चाहत्यांचे प्रेम, कौशल्य आणि डावपेच या सर्व बाबतीत एकमेकांना कडवी टक्कर असणारी ही लढत चाहत्यांसाठी दर्जेदार खेळाची पर्वणी असणार आहे.
अन्य लढतीत, कोस्टा रिका आणि ग्रीस आमनेसामने आहेत. ऊर्जापूर्ण आवेशी खेळ हे कोस्टा रिकाचे वैशिष्टय़, तर शांत, संथ खेळ ही ग्रीसची खासियत. बाद फेरीत तुलनेने सोपी आव्हाने पेलणाऱ्या ग्रीसला बाद फेरीच्या लढतीत मात्र दमदार आव्हानाचा सामना करायचा आहे. युरोपात असल्याने ग्रीसच्या खेळाडूंना क्लब स्तरावरील सामने खेळण्याचा अनुभव आहे. कोस्टा रिकाचे पारडे जड वाटत आहे, मात्र चिवट खेळासाठी ओळखला जाणारा ग्रीसचा संघही कोस्टा रिकासाठी अडचण ठरू शकतो.