शेवटच्या मिनिटांमध्ये गोल करून जिंकण्याचे कसब नेदरलँड्सने पुन्हा एकदा सिद्ध करत मेक्सिकोविरुद्ध थरारक विजय मिळवला. क्लास जॅन हंटेलारने ९४व्या मिनिटाला पेनल्टी किकच्या जोरावर गोल करत नेदरलँड्सला दिमाखदार विजय मिळवून दिला. अतिउष्ण वातावरणात झालेल्या या मुकाबल्यात मेक्सिकाने बहुतांशी वेळ वर्चस्व राखले मात्र शेवटच्या मिनिटांमध्ये दमदार खेळ करत नेदरलँड्सने बाजी मारली.
तिसऱ्याच मिनिटाला मेक्सिकोच्या मिग्युएल लायनने डावीकडून चेंडूवर नियंत्रण मिळवत जोरदार गोल केला. मात्र दूर अंतरावरून त्याने मारलेला फटका गोलजाळ्याच्या वरून गेला. नेदरलँड्सतर्फे वेस्ले श्नायजरने व्हॅन पर्सीकडे चेंडू सोपवला. मात्र व्हॅन पर्सीचा प्रयत्न अपुरा ठरला. नवव्या मिनिटाला नेदरलँड्सचा नायजेल डी जोंग दुखापतग्रस्त झाला. त्याच्या जागी मार्टिन्स इंडीला संधी मिळाली. १७व्या मिनिटाला जिओव्हानीने पेराल्टाकडे पास दिला. पेराल्टाने चेंडू शिताफीने हेरेराकडे सोपवला. मात्र त्याचा प्रयत्न गोलपोस्टच्या बाजूने गेला.
२३व्या मिनिटाला आर्येन रॉबेनने मेक्सिकोच्या बचावपटूंना भेदत आगेकूच केली. तो गोल करण्याच्या प्रयत्नात असताना मेक्सिकोच्या खेळाडूंनी धक्काबुक्की करत त्याला पाडले. मात्र तरीही नेदरलँड्सला फ्री-किक मिळाली नाही. हेरेराच्या आक्रमक खेळामुळे नेदरलँड्सच्या खेळाडूंना चेंडूवर नियंत्रणच मिळवता येत नव्हते. २८व्या मिनिटाला व्हॅन पर्सीचा गोलचा प्रयत्न गोलपोस्टच्या बाजूनेच गेला. प्रचंड उष्ण वातावरणामुळे ३३व्या मिनिटाला ‘कुलिंग ब्रेक’ घेण्याचा निर्णय सामनाधिकाऱ्यांनी घेतला. ३६व्या मिनिटाला मेक्सिकोच्या लायनने मारलेला क्रॉसचा फटका गोलपोस्टमध्ये जाऊ शकला नाही. ४२व्या मिनिटाला हेरेराने पेराल्टाला पास दिला. त्याने गाडरेडोला चेंडू सोपवला आणि त्याने जिओव्हेनीकडे दिला. मात्र जर्मनीचा गोलरक्षक सिल्लेसेनने हा प्रयत्न रोखला. रॉबिन व्हॅन पर्सी आणि आर्येन रॉबेनने यांनी एकत्रितपणे केलेला प्रयत्न मारक्युझने हाणून पाडला.
मध्यंतरानंतर लगेचच जिओव्हानी दोस सांतोसने गोल करत मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली. उसळी मिळालेल्या चेंडूला दोस सांतोसने छातीवर झेलले आणि त्यानंतर ३० यार्डावरून जोरदार गोल केला. नेदरलँड्सच्या गोलरक्षकाने डावीकडे झेपावत गोल थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. ५७व्या मिनिटाला रॉबेनने उजव्या दिशेने मारलेली किक डी व्रिजने गोलपोस्टच्या दिशेने जाण्यासाठी हेडर मारला. मात्र चेंडू ओचाओच्या हाताला लागून त्यानंतर क्रॉसबारला लागून बाहेर गेला. रॉबेनने झपाटय़ाने चेंडूवर नियंत्रण मिळवत गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र ओचाओने जमिनीलगत बसून हा प्रयत्न थोपवला. ७६व्या मिनिटाला व्हॅन पर्सीच्या ऐवजी हंटेलारला संधी देण्यात आली.
रॉबेनचा क्रॉसचा फटका हंटेलारने हेडरद्वारे केला मात्र ओचाओने तो थोपवला. ८८व्या मिनिटाला रॉबेनच्या कॉर्नरवर हंटेलारने गोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू श्नायजरकडे गेला आणि त्याने जोरदार गोल करत नेदरलँड्सला बरोबरी करून दिली. ९३व्या मिनिटाला रॉबेनला पाडण्याचा मेक्सिकोचा प्रयत्न अंगलट आला. सामनाधिकाऱ्यांनी नेदरलँड्सला पेनल्टी बहाल केली. हंटेलारने मेक्सिकोचा गोलरक्षक ओचाओला भेदत शानदार गोल केला आणि नेदरलँड्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jun 2014 रोजी प्रकाशित
ऑरेंज आर्मी झिंदाबाद!
शेवटच्या मिनिटांमध्ये गोल करून जिंकण्याचे कसब नेदरलँड्सने पुन्हा एकदा सिद्ध करत मेक्सिकोविरुद्ध थरारक विजय मिळवला.
First published on: 30-06-2014 at 01:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2014 netherland vs mexico