ठरल्याप्रमाणे बोनसची रक्कम मिळाल्याने नायजेरियाच्या खेळाडूंनी सरावाला जोमाने सुरुवात केली आहे. बोनसची रक्कम न मिळाल्याने नायजेरियाच्या खेळाडूंनी सराव सत्र रद्द केल्याचे वृत्त होते. मात्र खेळाडूंना बोनसची रक्कम मिळाली असून, त्यांनी पुन्हा खेळायला सुरुवात केल्याचे संघाच्या प्रवक्त्याने सांगितले.
‘‘भूतकाळात काय घडले यापेक्षा भविष्यावर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ आहे. आता कोणतीही समस्या नाही. सर्व खेळाडू सरावात व्यस्त आहेत. पैशासंदर्भात कोणताही वाद नव्हता. प्रत्येक खेळाडूला ठरलेली रक्कम देण्यात आली आहे. राष्ट्रीय संघातील खेळाडूंना बोनस मिळालेला नाही असे काहीही नाही,’’ असे संघाचे माध्यम व्यवस्थापक बेन अलैया यांनी सांगितले. बाद फेरीत नायजेरियाची लढत फ्रान्ससारख्या तुल्यबळ संघाशी होणार आहे.
पैशाच्या मुद्दय़ावरून वाद झालेला नायजेरिया हा विश्वचषकातला पहिला संघ नाही. कॅमेरून आणि घाना या दोन संघांतील खेळाडूंना आर्थिक फटका बसला होता. कॅमेरूनच्या संघाने बोनस मिळाल्याशिवाय ब्राझीलला जाणारे विमान पकडणार नाही, अशी भूमिका घेतली होती. दुसरीकडे बोनसची रक्कम न मिळाल्यास साखळी लढतीतील पोर्तुगालविरुद्धचा सामना न खेळता परतण्याची धमकी घानाच्या खेळाडूंनी दिली होती. या धमकीला गांभीर्याने घेत घाना सरकारने काही तासांत बोनसची रक्कम विमानाद्वारे ब्राझीलला रवाना केली होती.  
गेल्या वर्षी कॉन्फेडरेशन चषकातही पैशाच्या मुद्दय़ावरून नायजेरियाचे खेळाडू उशिरा दाखल झाले होते. त्या वेळी संघाने हॉटेल सोडण्यास आणि विश्वचषकाच्या पात्रता फेरीचे सामने खेळण्यास नकार दिला होता. त्या वेळी राजकारण्यांनी मध्यस्थी करत प्रश्न सोडवला होता. यानंतर नायजेरिया फुटबॉल महासंघाने विश्वचषकातल्या प्रत्येक गटवार लढतीच्या विजयासाठी १० हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस घोषित केले. बाद तसेच पुढच्या फेऱ्यांमधील विजयासाठी बोनसच्या रकमेत वाढ होणार आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक खेळाडूला १२,५०० अमेरिकन डॉलर्स इतक्या रकमेने गौरवण्यात येणार आहे.  ‘‘काही व्यक्ती राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही चांगला खेळ करत आगेकूच करू,’’ असा विश्वास नायजेरियाचे प्रशिक्षक स्टीफन क्वेशी यांनी व्यक्त केला.