स्पेन विरुद्ध नेदरलॅण्ड्स.. विश्वचषकातल्या खमंग मुकाबल्यांपैकी एक असा हा सामना. स्पेनच्या ताफ्यात फर्नाडो टोरेस, आंद्रेस इनिएस्टा अशा दमदार खेळाडूंची फौज तर नेदरलॅण्ड्सकडे आर्येन रॉबेन, रॉबिन व्हॅन पर्सी अशा अव्वल खेळाडूंचा भरणा. कौशल्याच्या मुद्दय़ावर दोन्ही संघ एकमेकांना कट्टर आव्हान उभे करणारे. त्यामुळे स्पर्धा कुठलीही असली तरी या दोन संघांमधील मुकाबला उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक होतोच हे नक्की. ‘टिकी-टाका’ या संकल्पनेनिशी खेळणारा स्पेनचा संघ पुन्हा एकदा सरशी साधण्यासाठी सज्ज झाला आहे. स्पेनने नेदरलॅण्ड्सवरच मात करीत २०१०च्या विश्वचषकावर नाव कोरले होते. त्यामुळे या सामन्याशी स्पेनचे ऐतिहासिकदृष्टय़ा भावनिक नाते आहे. दुसरीकडे विश्वचषकाच्या एवढे समीप येऊनही रिक्त हस्ते परतावे लागल्याचे दु:ख नेदरलॅण्ड्सच्या मनी आहे. या पराभवाची परतफेड करण्याची संधी नेदरलॅण्ड्सला आहे. तीन वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळूनही जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली आहे. यंदाचा नेदरलॅण्ड्सचा संघ जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी आहे. यूएफा चषकाच्या ‘ड’ गटात व्हॅन गाल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना नेदरलँड्सने अव्वल स्थान राखले होते. व्हॅन गाल यांनी १-५-३-२ या व्यूहरचनेचा उपयोग केला होता. प्रतिआक्रमणावर भर देणारी ही व्यूहरचना बचावाच्या पातळीवर अधिक प्रभावी आहे.
दुसरीकडे नेदरलॅण्ड्सची भिस्त आर्येन रॉबेन आणि रॉबिन व्हॅन पर्सीवर आहे. बायर्न म्युनिकचे प्रतिनिधित्व करणारा रॉबेन आणि मँचेस्टर युनायटेडतर्फे खेळणारा व्हॅन पर्सी यांना संघातील अन्य खेळाडूंची साथ मिळणे अपेक्षित आहे. अर्जेटिना, स्पेन किंवा जर्मनीप्रमाणे प्रसिद्धीवलय असणारे खेळाडू नेदरलॅण्ड्सकडे नाहीत. मात्र उपयुक्त खेळ करू शकतील, अशा युवा आणि अनुभवी खेळाडूंचे सुरेख मिश्रण या संघाकडे आहे.
ब्राझील आणि अर्जेटिना यांच्याबरोबरीने स्पेन जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. ‘टिकी-टाका’ संकल्पनेनुसार खेळ करण्यासाठी प्रसिद्ध स्पेनला पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्याची सर्वोत्तम संधी आहे. छोटे-छोटे वेगवान पासेस आणि विविध पद्धतीने सातत्याने गोलवरचे नियंत्रण म्हणजे टिकी-टाका. झाव्ही आणि इनिएस्टा हे दोघेही या पद्धतीद्वारे खेळ करण्यात निष्णात आहेत. २०१२नंतर स्पेनच्या संघाचा चेहरामोहरा फारसा बदललेला नाही. त्यामुळे टिकी-टाकानुसार खेळ करीत नेदरलॅण्ड्सला नामोहरम करण्याचा स्पेनचा प्रयत्न असणार आहे. १-४-३-३ ही स्पेनची व्यूहरचना असण्याची प्रबळ शक्यता आहे. विन्सेंट डेल बॉस्के यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना स्पेनने या संकल्पनेचा प्रभावी उपयोग केला आहे. सळसळत्या प्रतिभेच्या आणि गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यपूर्ण विजयी प्रदर्शन करणाऱ्या संघाला कमी लेखण्याची चूक नेदरलॅण्ड्सला करून चालणार नाही. ब्राझीलच्या भूमीवर विश्वचषक पटकावल्यास अखंडित वर्चस्वाचे नवे पर्व स्पेन घडवण्याच्या तयारीत आहेत. या जेतेपदासह सार्वकालीन महान संघांच्या मांदियाळीत स्थान पटकावण्यासाठीही स्पेनचा संघ आतुर आहे.
(लेखक फुटबॉल प्रशिक्षक आहेत.)
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2014 रोजी प्रकाशित
‘टिकी-टाका’ इतिहास घडवणार?
स्पेन विरुद्ध नेदरलॅण्ड्स.. विश्वचषकातल्या खमंग मुकाबल्यांपैकी एक असा हा सामना. स्पेनच्या ताफ्यात फर्नाडो टोरेस, आंद्रेस इनिएस्टा अशा दमदार खेळाडूंची फौज तर नेदरलॅण्ड्सकडे आर्येन रॉबेन, रॉबिन व्हॅन पर्सी अशा अव्वल खेळाडूंचा भरणा.
First published on: 13-06-2014 at 05:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2014 spain vs netherland set to history