अमेरिकेचा संघ विश्वचषक स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात भलेही अपयशी ठरला असो, पण २०२६मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या यजमानपदासाठी त्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. मंगळवारी बेल्जियमकडून हार पत्करल्यामुळे जर्गन क्लिन्समनच्या मार्गदर्शनाखालील अमेरिकेच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले. या स्पध्रेला अमेरिकेतून मोठा प्रतिसाद मिळाला. ब्राझीलमध्ये आलेल्या चाहत्यांमध्येही अमेरिकेचे नागरिक अग्रेसर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासुद्धा ‘ट्विटर’च्या माध्यमातून विश्वचषकावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ‘‘अमेरिकेच्या फुटबॉल क्षेत्राची बांधिलकी जपणे आवश्यक आहे. एनबीएपेक्षा फुटबॉल हा खेळ या देशात आता जास्त गर्दी खेचू लागला आहे. या देशातील २० दशलक्ष तरुण फुटबॉल खेळतात,’’ असे फिफाचे सरचिटणीस जेरोम वाल्के यांनी सांगितले.