विश्वचषक हा जगभरातील अव्वल संघांचा मेळा. स्पर्धेसाठी पात्र ठरलेला प्रत्येक संघ खंडवार लढतींचे आव्हाने पार करत पोहोचलेला. प्रत्येक संघाच्या पाश्र्वभूमीला आहे मोठा इतिहास, आठवणी आणि आकडेवारी. चार वर्षांनी एकदा होणाऱ्या या सोहळ्याचे जेतेपद आपल्याकडे असावे ही प्रत्येक संघाची इच्छा. ही महत्त्वाकांक्षी स्पर्धाच काही संघांना संभाव्य दावेदार ठरवते तर काहींना लिंबूटिंबू. आंतरराष्ट्रीय स्तराचा फारसा अनुभव नसलेले, मोठय़ा नावांचा अभाव असणारे आणि प्रसिद्धीच्या झोतापासून लांब असणाऱ्या संघांची संख्या यंदाही खूप आहे. मात्र म्हणून त्यांना कमी लेखणे किंवा त्यांच्याविरुद्ध सामना सहज जिंकू असा भ्रम बाळगणे किती अंगलट येऊ शकतो, हे जर्मनी-घाना, अर्जेटिना-इराण लढतीने सिद्ध केले.
इच्छाशक्ती असेल तर कठीण वाटणारे ध्येयही प्रत्यक्षात गाठता येते, हे इराणच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. या देशातली सामाजिक परिस्थिती खेळ खेळण्यासाठी अजिबातच पोषक नाही. दैनंदिन जगणे आणि सुरक्षितता या दोन गोष्टीच अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे फुटबॉलसारखा शारीरिकदृष्टय़ा दमछाक करणारा खेळ खेळण्याचे शिवधनुष्य इराणच्या खेळाडूंनी हाती घेतले. अर्जेटिनासारख्या बलाढय़ संघाला कडवी टक्कर देत त्यांनी हे शिवधनुष्य समर्थपणे पेलले आहे. लौकिकार्थाने निकालानुसार विजयी संघ म्हणून अर्जेटिनाचे नाव दिसेल, परंतु ९० मिनिटे आक्रमण आणि बचाव या दोन्ही पातळ्यांवर अर्जेटिनाला आव्हान देणाऱ्या इराणचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. इराणचे खेळाडू इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, सीरी ए अशा स्पर्धामध्ये खेळत नाहीत. त्यामुळे मालामाल होण्याचीही त्यांना संधी नाही. देशातल्या अस्थिर वातावरणामुळे त्यांना सरावासाठी अन्य देशात जावे लागते. आपल्या देशात फुटबॉलसाठी लागणारी प्रतिभा आहे, हे लक्षात आल्यावर त्यांच्या संघटनेने या प्रतिभेला वाव देण्यासाठी योग्य व्यक्तींना सामील करून घेतले. दुसऱ्या देशांच्या तज्ज्ञांना नियुक्त करण्यात त्यांनी कमीपणा मानला नाही. इराणच्या संघात सात विविध देशांचे सात सहयोगी कर्मचारी आहेत. जे जे चांगले ते आपल्याकडे असावे, या उक्तीने त्यांनी संघरचना केली आहे आणि ती यशस्वी होताना दिसते आहे.
अर्जेटिनाच्या संघात गोन्झालो हिग्वेन, अँजेल डी मारिया, लिओनेल मेस्सी, सर्जिओ एग्युरो असे एकापेक्षा एक खेळाडू होते. मात्र पहिल्या सत्रात इराणने त्यांना संधीच दिली नाही. झोनल मार्किंग या पद्धतीद्वारे डावपेच रचलेल्या इराणने अर्जेटिनाच्या खेळाडूंना जखडून ठेवले आणि जेव्हा अर्जेटिनाच्या खेळाडूंना गोल करण्याची संधी मिळाली त्या वेळी त्यांचा गोलरक्षक अलिरेझी हाघिघीने पहाडासारखा अभेद्य उभा होता. अर्जेटिनाच्या खेळाडूंचा हताशपणा जाणवणे हे इराणचे यश आहे. लाल रंगाच्या जर्सीमध्ये खेळणाऱ्या इराणने या रंगाला साजेसा बुलंद खेळ करत चाहत्यांची मने जिंकली.
अर्जेटिनाच्या यशाचा शिल्पकार ठरला लिओनेल मेस्सी. फॉर्म तात्पुरता असतो मात्र दर्जा हा कायमस्वरूपी असतो, हे मेस्सीने सिद्ध केले. आपण एकहाती सामना जिंकून देऊ शकतो हे मेस्सीने सप्रमाण सिद्ध केले. त्याच्याकडे वेळ अत्यंत थोडा होता, मात्र त्यामध्ये डाव्या पायाने किक मारत, इराणच्या सहा खेळाडूंना चकवत आणि अलीरेझा हाघिघीला भेदत त्याने केलेला गोल अवर्णनीय असाच होता.
अन्य लढतीत जर्मनीला घानाच्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले. हा सामना जिंकून सहजपणे बाद फेरी गाठण्याचा जर्मनीचा इरादा होता. मात्र ताकदवान आणि आक्रमक खेळ करणाऱ्या घानाने जर्मनीला वरचढ होऊ दिले नाही. सर्वसमावेशक संघ हे जर्मनीचे वैशिष्टय़ आहे. थॉमस म्युलर, मिरोस्लाव्ह क्लोस, ल्युकास पोडोलस्की असे एकापेक्षा एक खेळाडू असूनही जर्मनीला वर्चस्व गाजवता आले नाही. हरण्याची भीती न बाळगता जर्मनीचा संघ खेळतोय. तूर्तास तरी त्यांची वाटचाल निर्धोकपणे सुरू आहे. मात्र कोणालाही कमी लेखण्याची चूक त्यांचा घात करू शकतो. इराण आणि घानाच्या खेळाने फुटबॉलमधल्या छोटय़ा राष्ट्रांचे मोठेपण सिद्ध झाले आहे. भविष्यात याच संघांनी चमत्कार घडवल्यास आश्चर्य वाटायला नको.