FIFA World Cup 2018 हा एकच शब्द सध्या क्रीडाप्रेमींच्या वर्तुळात ऐकायला मिळत आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेला फुटबॉल विश्वचषक आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे या खेळासाठी पूरक असंच वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे. फुटबॉल या खेळाला भारतातही चांगलाच प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. पण, फुटबॉलच्या अशा चाहत्यांच्या गर्दीत जर तुम्ही स्वत:ला या खेळाचा ‘जबरा फॅन’ म्हणवत असाल तर तुम्ही चुकीचे ठरु शकता.
कारण, कोलकात्याचं एक वयोवृद्ध दाम्पत्य सध्या फिफाचं जबरा फॅन ठरत असून हटके ‘कपल गोल्स’ देत आहे. गेले नऊ विश्वचषक याचीदेही याची डोळा पाहिल्यानंतर हे जोडपं आता तब्बल दहाव्या वेळी फिफाचा अनुभव घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. पन्नालाल चॅटर्जी (८५) आणि चैताली चॅटर्जी (७६) फुटबॉल विश्वचषक पाहण्यासाठी रशियाला रवाना होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिफाचे सामने लाइव्ह पाहण्यासाठी जाणाऱ्या या जोडीसाठी आतापर्यंतचा हा प्रवास तितका सोपा नव्हता. मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टींची तडजोड करावी लागली होती आणि त्यांनी ती केलीसुद्धा. हे सर्व त्यांनी केलं ते म्हणजे फक्त आणि फक्त फुटबॉल विश्वचषकाच्या प्रेमापोटी. १९८२ मध्ये त्यांनी स्पेन विश्वचषक पाहिला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्यात फुटबॉलही अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा घटक ठरला. पण, इतका सुरेख खेळ कृष्णधवल रंगाच्या ट्व्हिवर पाहण्यापेक्षा तो थेट त्या ठिकाणा जाऊनच पाहण्याचा अट्टहास त्यांनी धरला आणि त्या दिशेने काही पावलं उचलत फुटबॉलचे सामने लाइव्ह पाहणं सुरु केलं. १९८६ मध्ये त्यांना विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्याची संधी मिळाली जेव्हा दिएगो मॅराडोनाच्या अर्जेंटिना या संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याविषयीच FIFA.com ला दिलेल्या मुलाखतीत चैताली यांनी त्या ऐतिहासिक सामन्याच्या आठवणी जागवल्या होत्या.

FIFA World Cup, Old Kolkata Couple

वाचा : जेतेपदाच्या दिशेने अर्जेंटिनाचे पाऊल

यंदाच्या विश्वचषकासाठीसुद्धा हे एव्हरग्रीन जोडपं खुपच उत्साही आहे. पण, तीन सामन्यांपेक्षा जास्त खर्च त्यांच्या खिशाला परवडणारा नसल्यामुळे आता त्यांनी थेट फिफाच्या आयोजकांकडेच यासाठी मदतीचा हात मागितला आहे. फिफाकडून त्यांना अद्यापही कोणतं उत्तर देण्यात आलेलं नसलं तरीही त्यांनी उत्तराच्या आशा मात्र कायम ठेवल्या आहेत.

चॅटर्जी जोडप्याचं या खेळावरचं प्रेम पाहता यंदाचा फुटबॉल विश्वचषक त्यांच्यासाठी खूपच खास ठरणार आहे, कारण पुढचा वर्ल्ड कप येईपर्यंत त्यांचं वय वाढलेलं असून, शरीर कुठवर साथ देईल याविषीच ते साशंक आहेत. त्यामुळे कतार विश्वषकाचं ठाऊक नाही, पण, होsssssला गोsssssssल असं म्हणण्यासाठी यंदातरी हे ‘जबरा फॅन’ दाम्पत्य सज्ज आहे असं म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2018 russia old kolkata couple is attending their 10th world cup football lover
First published on: 04-06-2018 at 12:23 IST