फ्रान्सविरुद्धचा सामना नायजेरियाच्या जोसेफ योबोच्या कारकिर्दीतील विक्रमी शंभरावा सामना होता. छोटय़ा देशाच्या खेळाडूंच्या नशिबी हा योग दुर्मीळच. हा शतकी सामना विजयासह साजरा करण्याचे योबोचे स्वप्न उधळले गेले. दुर्दैव म्हणजे कारकिर्दीतल्या या अखेरच्या लढतीत योबोच्या स्वयंगोलनेच फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब झाली. गेली १३ वर्षे नायजेरियाच्या संघाची बचावफळी समर्थपणे सांभाळणाऱ्या योबोच्या कारकिर्दीचा शेवट मात्र पराभवाने झाला.
‘‘इंग्लंडमधील नॉरविच क्लबतर्फे खेळण्यासाठी आणि कुटुंबाला वेळ देता यावा याकरिता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतो आहे. नायजेरियाच्या चाहत्यांचे मनापासून आभार. हा प्रवास आनंददायी आणि समाधानकारक होता. नायजेरियाला आफ्रिका चषक मिळवून दिला. दुखापतीमुळे विश्वचषकात खेळू शकेन असे वाटले नव्हते. आता युवा खेळाडू ही परंपरा पुढे चालवतील, अशी आशा आहे. विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली होती,’’ अशा शब्दांत योबोने आपल्या भावना व्यक्त केल्या.