चिलीची कडवी झुंज.. निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी.. अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना गोल करण्यात आलेले अपयश.. पेनल्टी-शूटआऊटमध्ये ब्राझीलचा गोलरक्षक ज्युलियो सेसारने चिलीचे दोन प्रयत्न परतवून लावलेले.. चार-चार प्रयत्नानंतर २-२ अशी बरोबरी.. पाचव्या वेळी नेयमारचा यशस्वी गोल.. आता नजरा गोंझालो जाराकडे खिळलेल्या.. सेसार सज्ज.. सर्वाच्या हृदयाचे ठोके थांबलेले.. किक मारण्यासाठी जाराने कूच केली.. चेंडू लगावल्यानंतर गोलजाळ्याला लागून बाहेर गेला.. आणि ब्राझीलने पेनल्टी-शूटआऊटमध्ये ब्राझीलने ३-२ असा विजय मिळवला. चिलीने प्रयत्न तोकडे पडले, अन्यथा घरच्या मैदानावर जेतेपद पटकावण्याचे ब्राझीलचे स्वप्न बाद फेरीतच संपुष्टात आले असते.
१६व्या मिनिटालाच डेव्हिड लुइझने गोल झळकावून ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर चिलीचा तिखटपणा ब्राझीलला जाणवू लागला. काही मिनिटानंतरच चिलीने बरोबरी साधली. त्यानंतर चेंडूवर सर्वाधिक वेळ नियंत्रण, गोल करण्याच्या सुरेख संधी निर्माण करून चिलीने सर्वाची मने जिंकली. पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला चिलीने दिलेली कडवी झुंज पाहता, ‘क्या खूब लढी, चिली’ असेच त्यांच्या कामगिरीचे वर्णन करता येईल. चिलीने निर्धारित वेळेत आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेतही ब्राझीलला १-१ असे बरोबरीत रोखले होते.
ब्राझीलने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा अवलंबत चिलीच्या गोलक्षेत्रात हल्ले चढवले. पाचव्या मिनिटाला हल्कने दिलेल्या क्रॉसवर मार्सेलोने डाव्या पायाने मारलेला फटका गोलजाळ्याच्या बाजूने गेला. पण १८व्या मिनिटाला ब्राझीलला पहिले यश मिळाले. डाव्या कॉर्नरवरून नेयमारने दिलेल्या पासवर चेंडू डेव्हिड लुइझच्या समोर पडला. अखेर त्याने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. पहिला गोल झाल्यानंतर ब्राझीलवासीयांनी स्टेडियम दणाणून सोडले. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ३२व्या मिनिटाला चिलीने बरोबरी साधणारा गोल केला. ब्राझीलचे बचावपटू स्टेडियमच्या मध्यभागी असताना एड्वाडरे वरगासने चेंडूवर ताबा मिळवला. त्यानंतर तो अ‍ॅलेक्सी सांचेझकडे सोपवत त्याने आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. आता सांचेझला चेंडूला अंतिम दिशा दाखवायची होती. चेंडूवर नियंत्रण मिळवल्यानंतर उजव्या बाजूने आगेकूच करत उजव्या पायाने जोरदार फटका लगावत ब्राझीलचा गोलरक्षक ज्युलिओ सेसारला चकवून गोल झळकावला. ४०व्या मिनिटाला त्याने पुन्हा एकदा गोल करण्याची संधी निर्माण केली. नेयमारने चेंडू थिआगो सिल्वाकडे सोपवल्यानंतर त्याने तो फ्रेडकडे पास केला. पण फ्रेडला गोल करण्यात अपयश आले. मध्यंतरापर्यंत १-१ अशी बरोबरीच कायम होती.
दुसऱ्या सत्रात १०व्या मिनिटालाच हल्कने गोल केला. त्यानंतर स्टेडियममध्ये पुन्हा एकदा यजमान चाहत्यांच्या जल्लोषाला उधाण आले. पण चेंडूवर नियंत्रण मिळवताना हल्कने तो हाताने थांबवला होता. रेफ्री हॉवर्ड वेब यांनी शिटी मारूनही हल्कने गोल केल्यामुळे रेफ्रींनी त्याला पिवळे कार्ड दाखवले. ६५व्या मिनिटाला चिलीच्या आर्टुरो विदालचा प्रयत्न सेसारने हाणून पाडला. मॉरिसियो इस्लाने विदालकडे चेंडू दिल्यानंतर ब्राझीलच्या बचावपटूंच्या मागे उभे असणाऱ्या विदालने तो हळूहळू पुढे सरकवत चेंडू गोलक्षेत्रात नेला. त्यानंतर त्याने मारलेला फटका सेसारने अडवला. दुसऱ्या सत्रावर चिलीचेच वर्चस्व राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup brazil shoot their way into quarters
First published on: 29-06-2014 at 01:56 IST