ब्राझीलच्या विश्वचषकाचे आशास्थान असलेला नेयमार दुखापतग्रस्त झाल्याने यजमानांना आता नाइलाजास्तव आपल्या डावपेचांमध्ये बदल करावे लागणार आहेत. नेयमारच्या जागी मध्यरक्षक विलियन बोग्र्स डा सिल्वा खेळवण्याचे संकेत ब्राझीलचे प्रशिक्षक लुइस फेलिपे स्कोलारी यांनी दिले आहेत.
ब्राझीलचे राखीव खेळाडू आणि २० वर्षांखालील स्थानिक संघादरम्यान झालेल्या सराव सामन्यात विलियन नेयमारच्या जागी खेळला. संघातील प्रमुख खेळाडूंनी तंदुरुस्तीसाठी कसून मेहनत घेतली. परंतु मैदानावर सराव केला नाही. मात्र नेयमारच्या जागी खेळू शकतील अशा सर्व खेळाडूंनी कसून सराव केला. बचाव मध्यरक्षकाच्या भूमिकेत विलियन खेळला. दुखापतग्रस्त होण्यापूर्वी नेयमार ब्राझीलसाठी हीच भूमिका निभावत होता. नेयमारऐवजी खेळवण्यासाठी स्कोलारी यांच्यासमोर रामीरेस, बर्नार्ड आणि हर्नानीस यांचा पर्याय खुला आहे.
ब्राझीलने हा सराव सामना ३-० असा जिंकला. बरनार्ड, डांटे आणि रामिरेस यांनी प्रत्येकी एक गोल केला. जर्मनीविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीचा ब्राझीलचा हा सराव सामना होता.
‘‘नेयमारची कोणत्याही खेळाडूशी तुलना होऊ शकत नाही. तो अतिशय दर्जेदार खेळाडू आहे. माझी शैली वेगळी आहे. तो आघाडीपटू आहे. अधिकाअधिक गोल करणे ही त्याची कार्यपद्धती आहे. याउलट सहकाऱ्यांना गोल करण्यासाठी साहाय्य करणे ही माझी भूमिका असते,’’ असे विलियनने सांगितले.
‘‘नेयमारची जागा घेणे खरेच कठीण आहे. ही कठीण परिस्थिती आहे. आपल्याच संघसहकाऱ्याला दुखापत झालेली असताना खेळायची संधी मिळणे कोणत्याही खेळाडूला आवडणारे नाही. पण आपल्याला वस्तुस्थिती स्वीकारायला हवी,’’ असे बर्नार्डने सांगितले.
दोन पिवळी कार्ड्स मिळाल्याने ब्राझीलचा कर्णधार थियागो सिल्वा जर्मनीविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी डांटेला संधी मिळण्याची शक्यता आहे, तर डेव्हिड लुइसकडे कर्णधारपद सोपवण्यात येणार आहे, असे संकेत प्रशिक्षक स्कोलारी यांनी दिले आहेत.
सिल्वावरील बंदी उठवावी यासाठी ब्राझील फुटबॉल महासंघाने फिफाला विनंती केली आहे. मात्र त्यांच्या बाजूने निर्णय लागण्याची शक्यता धुसर आहे. २०१०च्या विश्वचषकानंतर ब्राझीलच्या ६० लढतींपैकी नेयमार केवळ सहामध्ये खेळू शकला नाही. त्याने प्रतिनिधित्व केलेल्या ५४ सामन्यांपैकी ब्राझीलने ३६ सामनेजिंकले, १२ सामन्यांत बरोबरी केली, तर सहा सामने गमावले आहेत. यंदाच्या विश्वचषकातही ब्राझीलने केलेल्या गोलसंख्येपैकी निम्मे गोल नेयमारनेच केले आहेत.
नेयमार नसल्याची जर्मनीला खंत
सांतो आंद्रे : विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्राझीलचा प्रमुख खेळाडू नेयमार खेळू शकणार नाही, हे निराशाजनक आहे, असे मत जर्मनीच्या खेळाडूंनी व्यक्त केले आहे. नेयमारची दुखापतसुद्धा ब्राझीलसाठी प्रेरणादायी ठरू शकेल, असे जर्मनीचा मध्यरक्षक बॅस्टियन श्वेनस्टेगरने सांगितले. श्वेनस्टेगर, कर्णधार फिलिप लॅम आणि मध्यरक्षक सॅमी खेडिरा या सर्वानी नेयमारचे समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोलंबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे नेयमारला विश्वचषकातून माघार घ्यावी लागली आहे. ‘‘प्रतिस्पर्धी संघाचे सर्वोत्तम खेळाडू मैदानावर असतील, तर सामना रंगतदार होतो. नेयमार या सामन्यात खेळत नसल्याची आम्हाला खंत वाटत आहे. परंतु या घटनेमुळे ब्राझीलचा संघ प्रेरित होईल आणि नेयमारसाठी जगज्जेतेपद जिंकेल,’’ असे श्वेनस्टेगरने सांगितले. ‘‘नेयमार हा शानदार खेळाडू असून, त्याने आपला दर्जा विश्वचषक स्पध्रेत दाखवला आहे,’’ असे लॅमने सांगितले.