विश्वचषकाचा प्रवास दुसऱ्या फेरीत संपुष्टात येणे दु:खदायक आहे. मात्र पराभवाचे खापर एखाद्या खेळाडूवर फोडण्यात धन्यता मानण्यापेक्षा आपण एकत्र यायला हवे, असे मत नायजेरियाचे प्रशिक्षक स्टीफन केशी यांनी व्यक्त केले. दरम्यान, या पराभवाची जबाबदारी स्वीकारत केशी यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. ते दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याची शक्यता आहे.
‘‘फ्रान्ससारख्या संघाला कडवी टक्कर देणाऱ्या नायजेरियाला पराभव स्वीकारावा लागला. नायजेरियाच्या खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे फ्रान्सचा संघ यशस्वी ठरला. त्यामुळे सर्व खेळाडू पराभवासाठी समान जबाबदार आहेत,’’ असे केशी यांचे म्हणणे आहे.
‘‘पराभव झाल्यानंतर प्रत्येक जण टीका करतो. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात, मात्र आम्ही असे करणार नाही. एक संघ म्हणून आपण एकत्र राहायला हवे,’’ असे आवाहन केशी यांनी केले.
‘‘पराभवाने यात बदल होणार नाही. कुठलाही पराभव, मग तो पहिल्या फेरीतला असो, बाद फेरीतला, तो वाईटच असतो. जेव्हा संघ चांगला खेळत असतो, ठरलेल्या योजनांची मैदानावर अंमलबजावणी होत असते आणि अचानक असा पराभव होतो तेव्हा त्रास होतो. फ्रान्सविरुद्ध अशा पराभवाचे आम्ही हकदार नाही; परंतु हा खेळाचा भाग आहे. हे कधीही घडू शकते,’’ असे केशी यांनी सांगितले.