भुवनेश्वर शहरात सुरु असलेल्या FIH Series Finals स्पर्धेत भारतीय संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. सलामीच्या सामन्यात रशियाचा १०-० ने धुव्वा उडवणाऱ्या भारताने दुसऱ्या सामन्यात पोलंडवर ३-१ ने मात केली. आगामी २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकीसंघासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

सलामीच्या सामन्याप्रमाणेच पोलंडविरुद्धही भारताने आक्रमक सुरुवात केली. मनप्रीत सिंहने २१ व्या मिनीटाला गोल करत भारताचं खातं उघडलं. मात्र पोलंडने या धक्क्यातून सावरत लगेच आक्रमक पवित्रा घेतला. मॅटेउज हुलबोजने २५ व्या मिनीटाला भारताचा बचाव भेदत पोलंडला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.

मात्र पोलंडाच्या या आक्रमणासमोर दबून न जाता भारताने जोरदार हल्ला चढवला. २६ व्या मिनीटाला मनप्रीत पुन्हा एकदा गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिला. यानंतर दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेऊन खेळ केला. अखेरीस ३६ व्या मिनीटाला हरमनप्रीत सिंहने गोल करत भारताची आघाडी ३-१ ने वाढवली. यानंतर सामन्यात पुनरागमन करणं पोलंडला जमलं नाही. अखेरीस भारताने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.