इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या क्रिकेटमधील श्रीमंत राष्ट्रांची परंपरागत ‘खुन्नस’ अ‍ॅशेस कसोटी मालिकेत पाहायला मिळते. या महत्त्वाच्या स्पध्रेकडे सध्या अखंड क्रिकेटजगताचे लक्ष आहे. पण भारतासारख्या क्रिकेटमधील अव्वल संघाला आपल्या देशात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमंत्रित करणाऱ्या झिम्बाब्वेकडे सर्वाचेच दुर्लक्ष होत आहे.
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेचा थरार एकीकडे रंगात आला असताना तिकडे भारताने दुबळ्या झिम्बाब्वेचे आव्हान ५-० असे मोडित काढले. झिम्बाब्वेमधील क्रिकेट जिवंत राहावे, हाच या मालिकेचा प्रमुख उद्देश होता. झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाच्या २०१२मधील आर्थिक ताळेबंदामध्येच हे स्पष्ट होते की, त्यांच्या तिजोरीतील आकडय़ापेक्षा त्यांचे ऋण अधिक आहे. १५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सहून अधिक रकमेची कर्जे त्यांनी घेतलेली आहेत. यापैकी बहुतांशी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून घेतलेली आहेत.