पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाह अडचणीत आला आहे. यासिर शाह आणि त्याच्या एका मित्राविरोधात १४ वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याच्या आरोप करण्यात आलाय. या मुलीवर बलात्कार करुन त्यानंतर तिला यासिर आणि त्याचा मित्र सतत धमकावत होते असं सांगण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. पोलीस आता या अल्पवयीन मुलीची वैद्यकीय चाचणी करण्याच्या तयारीत आहेत. या चाचणीचा निकाल आल्यानंतर पुढील कारवाईसंदर्भात निर्णय घेतला जाईल. या प्रकरणाबद्दल अद्याप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार यासिर शाहचा मित्र फरहानने एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. या सर्व प्रकाराचा फरहानने व्हिडीओही बनवला. त्यानंतर त्याने या मुलीचं आणि यासिरचं बोलणं करुन दिलं. एफआयआरमधील माहितीनुसार यासिरने या संवादादरम्यान मुलीला धमकी देत घडलेल्या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता न करण्यास सांगितलं. इतकच नाही तर यासिरने या पिडीत मुलीने त्याच्या मित्राशी लग्न करावं म्हणून तिच्यावर दबावही टाकला. या प्रकरणामध्ये आता वैद्यकीय चाचणीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
यासिर शाहच्या आधी पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमवरही बलात्काराचे आरोप करण्यात आलेत. यापूर्वीही अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंची नावं अशाप्रकरच्या गुन्ह्यांमध्ये समोर आली आहेत. मात्र बाबरबरोबरच इतरही अनेक खेळाडूंविरोधात आरोप सिद्ध झाले नाहीत. प्रकृतीसंदर्भातील अडचणींमुळे यासिर शाहला बांगलादेश दौऱ्यावर संघासोबत जाता आलं नाही. पाकिस्तानने बांगलादेशविरोधातील ही मालिका २-० ने जिंकली. ३५ वर्षीय यासिर शाहच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास त्याने आतापर्यंत ४६ कसोटी सामने खेळले आहेत. ३१ च्या सरासरीने त्याने २३५ बळी घेतलेत. त्याने १६ वेळा पाच गडी बाद करण्याचा तर एका सामन्यात १० गडी बाद करण्याचा पराक्रम तीन वेळा केलाय. ४१ धावांमध्ये आठ गडी बाद करण्याची सर्वोत्तम कामगिरी त्याच्या नावावर आहे.