रेकिफे हे ब्राझीलमधील सुंदर शहर. गिल्बेटरे फ्रेयरे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर आल्यावर या शहराच्या, तेथील संस्कृतीच्या खुणा जाणवू लागतात. वरती निरभ्र आकाश आणि पावसाची रिपरिप. तश्सा रेकिफे आणि ब्राझीलमधील उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अधूनमधून रिमझिम पाऊस सुरूच असतो. पाऊस आल्यानंतर अतिउष्ण रेकिफेमधील वातावरणात मस्त गारवा आला होता. एरवी घामाने त्रस्त असलेले रेकिफेवासीय पाण्याच्या वर्षांवाने आनंदित झाले होते.
‘‘फक्त एकच ठिकाण तुमच्या आनंदात आणखी भर घालू शकते,’’ माझा ड्रायव्हर एड्वाडरे सांगत होता. कधी, कुठे, काय, केव्हा, अशा प्रश्नांची सरबत्ती त्याच्यावर सुरू झाली. ‘‘मी तुम्हाला बार द अर्माडोमध्ये घेऊन जातो,’’ माझ्या सर्व प्रश्नांना त्याने एका वाक्यात उत्तर दिले होते. यू-टर्न घेतल्यानंतर एड्वाडरेसह माझेही डोळे ओलिंडा येथील डच लोकांच्या कॉलनीकडे खिळले होते. सकाळचे ११.३० वाजले असतानाही बार द अर्माडो जवळपास खचाखच भरला होता. पिवळ्या आणि लाल रंगाच्या खुच्र्या किंवा बसायला मोठे लाकडी बाक. आत शिरल्यानंतरच अर्माडोच्या मालकाची मुलगी कार्मिन्हा हिने एड्वाडरेच्या गालाचे चुंबन घेतले. डाव्या हाताने दिशा दाखवत ती आम्हाला बारमध्ये घेऊन गेली.
सूर्य डोक्यावर आल्यामुळे मला खूप तहान लागली होती. मी लगेच विचारले, ‘‘आपण आज काय घेणार आहोत?’’ माझ्या या प्रश्नाने दोघांच्याही चेहऱ्यावरील भाव उतरले. जणू असे विचारून मी त्यांचा अपमानच केला होता. बारमध्ये उपस्थित असलेल्यांच्या उत्साह शिगेला पोहोचला होता. टाळ्या, शिटय़ा वाजवून ते कसला तरी आनंद साजरा करत होते. पण तितक्याच एड्वाडरेने वातावरणातील गांभीर्य काहीसे कमी केले. ‘‘आम्ही पाणी नक्कीच घेणार नाही,’’ असे एड्वाडरे म्हणाल्यानंतर पुन्हा कार्मिन्हाच्या चेहऱ्यावर हास्य परतले.
थोडय़ाच वेळात आमच्यासमोर पाण्याने भरलेले छोटे ग्लास, पिशवी भरून बर्फ आणि लिंबाचे कापलेले तुकडे आणून ठेवले. ‘‘याला ब्राझीलमध्ये पिटू म्हणतात,’’ त्या छोटय़ा ग्लासकडे बोट दाखवून एड्वाडरे म्हणाला. ‘‘यासाठी आपल्याला पोर्तुगालचे आभार मानावे लागतील. हे घेतल्यानंतर तुम्ही थोडय़ा वेळाने माझे आभार मानाल,’’ असे सांगत एड्वाडरेची छाती अभिमानाने फुलली होती. पिटू हे ब्राझीलमधील सर्वाधिक लोकप्रिय पेय. उसाच्या रसापासून बनलले. टकिलाप्रमाणे घशाला जळजळ न होणारे. ‘‘थोडय़ाच वेळात तुमच्या शरीरात आगीचा डोंब उसळेल,’’ भरलेले खेकडे घेऊन आलेली कार्मिन्हा म्हणाली. एका हातात लिंबू आणि दुसऱ्या हातात पिटूचा ग्लास घेऊन आम्ही रेकिफेच्या त्या झगमगाटात हरवून गेलो.