नववर्षांत होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पाश्र्वभूमिवर येथील युवा चित्रकार नयन नगरकर यांनी तयार केलेल्या ‘इन्थ्युसिआस्म’ या ‘युनिव्हर्सल फुटबॉल ड्रॉईंग कॅलेंडर २०१८’ ला इंग्लंडमधील लिव्हरपूल फुटबॉल क्लबच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. या दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्याच्या पानावर फुटबॉलविषयक रेखाचित्रांची मांडणी करण्यात आली असून पेले, मॅराडोना, लिओनेल मेस्सी, रोनाल्डो यांसारख्या प्रसिध्द आजी-माजी खेळाडूंना नयन यांनी ही दिनदर्शिका अर्पण केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शालेय जीवनात फुटबॉलमध्ये कारकीर्द करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नयनला नशिबाने साथ न दिल्याने त्याने चित्राकलेकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. चित्रकलेची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्म झाल्याने नयनला या क्षेत्रात जम बसविण्यास वेळ लागला नाही. विशेषत: रेखाचित्र हा त्याचा आवडीचा विषय. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून पदवी घेतल्यानंतर नयनने रेखाचित्र साकारण्याची स्वत:ची अशी वेगळी शैली विकसित केली. ‘रिडर्स’, ‘व्हायोलिन’, ‘क्लिकिंग अ मोमेंट’ अशी त्याची रेखाचित्रांची प्रदर्शने स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर अनेक ठिकाणी भरवली गेली. फुटबॉलचे मैदान गाजविता न आल्याची रूखरूख नयनने रेखाचित्रांच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला.

फुटबॉलला वाहिलेल्या रेखाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजनही तो करू लागला. क्रिकेटप्रमाणेच इंग्लंडमध्ये फुटबॉलचे अनेक क्लब असल्याने नयनने २०१५ मध्ये लिव्हरपूल फुटबॉल क्लबशी संपर्क साधत त्यांच्याकडे आपली रेखाचित्रे सादर केली. रेखाचित्रांनी प्रभावित होऊन लिव्हरपूल क्लबच्या वतीने नयनला प्रशस्तीपत्रक दिले. त्यामुळे प्रोत्साहन मिळालेल्या नयनने आपली रेखाचित्रे जगभरातील फुटबॉलप्रेमींकडे पोहचविण्याचा ध्यास घेतला. २०१८ वर्षांत होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमुळे रेखाचित्रांकडे सर्वाचे लक्ष वेधता येईल हे ध्यानात घेऊन नयनने लंडनच्या लिव्हरपूल क्लबसाठी फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंचे जोरकस रेखाचित्रांचे ‘इन्थुसिसम’ या नावाने दिनदर्शिका तयार केली. या दिनदर्शिकेत किक मारतांना, चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेली झटापट, हेडरव्दारे गोल करण्याचा प्रयत्न अशी रेखाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. या रेखाचित्रांमधून ऊर्जा, ताकद आणि प्रेम यांचे दर्शन होत असल्याचे नयनचे म्हणणे आहे. या दिनदर्शिकेसाठी त्यास टाटा स्पोर्टस क्लबचे व्यवस्थापक कुमार यांची मदत झाली. लिव्हरपूल फुटबॉल क्लबचे खेळाडू तसेच फुटबॉलप्रेमींकडून दिनदर्शिकेला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा नयनने केला आहे.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Football calendar liverpool football club
First published on: 01-01-2018 at 02:19 IST