‘झोपडपट्टी फुटबॉल’चा ‘स्लम सॉकर’पर्यंतचा सामाजिक प्रवास
लोक काय म्हणतील, हा विचार समाजातील वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जितका फायदेशीर आहे, तितकाच तो समाजकार्याच्या आड येणाराही आहे. पण या लोकांमध्ये जेव्हा कुटुंबातील सदस्य सहभागी होतात, तेव्हा समाजकल्याणासाठी उचलेला विडाही पेलेनासा होतो. या पेचप्रसंगातून मार्ग काढणे फारच आव्हानात्मक होते. नागपूरच्या प्राध्यापकांसमोरही असाच पेचप्रसंग उभा राहिला होता. कुटुंबातील व्यक्तीच त्यांच्या समाजोपयोगी मार्गाच्या आड आली. आड म्हणण्यापेक्षा त्यांना प्राध्यापकांनी सुरू केलेले कार्य काही आवडेना. पण त्यांचा रुसवा अनुकूलतेमध्ये बदलत प्राध्यापकांनी १५ वर्षांपूर्वी रोवलेल्या बीजातून वटवृक्ष निर्माण झाला आहे आणि जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात ‘फिफा’ने त्यांच्या उपक्रमाचा गौरव केला आहे. नागपूरच्या या प्राध्यापकांचे नाव आहे, विजय बारसे!
हिस्लॉप महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या बारसे यांना खेळात फार रुची होती. आशियाई दौऱ्यावर गेलेल्या भारतीय हॅण्डबॉल संघाचे प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच १९८२साली दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत स्पध्रेत ते सामनाधिकारी होते. त्यामुळे या ना त्या कारणाने ते सतत खेळाशी जोडले गेले आणि समाजाला आपण काही देणे लागतो, या भावनेने त्यांनी २००२ मध्ये ‘झोपडपट्टी फुटबॉल’ असा उपक्रम हाती घेतला.
‘‘पगारातून घरखर्च भागवल्यानंतर काही रक्कम शिल्लक राहायची. त्या उरलेल्या रकमेतून समाजासाठी काही करता येईल का, हा प्रश्न सतत अस्वस्थ करायचा. पण त्या समाजकल्याणात क्रीडा हा समान धागा असावा असा अट्टहास होता. पावसाळ्यात एकदा अमरावतीला जात असताना हॉकी मैदानावर (तेव्हा टर्फ नव्हते) चिखलात झोपडपट्टीतली बरीच मुले-मोठी माणसे बादलीला लाथ मारून खेळ खेळताना मला दिसली. ही मुले ज्यांच्यासमोर काही ध्येय नाही. आजचा दिवस काढायचा, हेच त्यांच्यासमोरील लक्ष्य आणि त्यामुळे त्यांची प्रगती नाही व विविध व्यसनांच्या आहारी ती जात होती. अशा या मुलांना खेळताना पाहून सुरुवातीला आश्चर्य वाटले, परंतु याच माध्यमांतून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची शक्कल सुचली,’’ असे विजय बारसे यांनी सांगितले.
बारसे यांच्या या संकल्पनेवर सुरुवातीला मित्रांनी, घरच्यांनी नकारघंटा चालवली; परंतु एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे न घेण्याच्या निश्चयाचे ते होते. त्यांनी त्या मुलांशी संवाद साधला, त्यांना खेळण्यासाठी फुटबॉल दिला आणि स्पर्धा आयोजन करण्याचे आश्वासनही दिले. २००२ साली ‘झोपडपट्टी फुटबॉल’ ही स्पर्धा बारसे यांनी आयोजित केली. स्थानिक वृत्तपत्रांच्या साहाय्याने स्पध्रेबाबतची माहिती अनेकांपर्यंत पोहोचवली आणि पहिल्याच प्रयत्नांत शेकडोच्या संख्येने संघ सहभागी झाले. पण ही स्पर्धा झोपडपट्टीतील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना खेळात गुंतवून व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी होती आणि म्हणूनच या स्पध्रेचे नियम त्यांना कळतील असे साधे सोपे होते (ऑफ साइड आदी नियम नव्हते). त्यामुळे ही स्पर्धा फुटबॉलला मारक असल्याची बोंब जिल्हा संघटनांकडून होऊ लागली.
दरम्यान, स्पर्धेतील सहभागासाठी झोपडपट्टीतली मुले प्राध्यापकांच्या घरी येऊ लागली. फाटके कपडे, असभ्य भाषा अशी मुले घरी आल्याची नाराजी प्राध्यापक बारसे यांच्या कुटुंबीयांमध्ये पसरत होती. त्यांच्या पत्नीसह मुलांनीही विरोध केला, परंतु ते आपल्या मार्गावर चालत राहिले. ते अनुभव मांडताना बारसे म्हणाले, ‘‘ही मुले स्पध्रेत सहभाग घ्यावा, यासाठी घरी यायची. मी स्पर्धा आयोजनासाठी फिरतीवर असल्यामुळे घरी परतेपर्यंत ती घराबाहेर वाट पाहायची. त्यांचे मळकटलेले चेहरे, पान खाणे आणि भाषा यामुळे घरचे माझ्यावर काहीसे नाराज होते. त्यांनी अनेकदा तसे बोलूनही दाखवले, परंतु मी कार्य सुरूच ठेवले. पहिल्याच वर्षी इतका प्रतिसाद मिळाला की चार विभागांत ही स्पर्धा घ्यावी लागली. हा प्रवास असाच अविरत सुरू होता व या मुलांमध्येही प्रचंड प्रगती होत गेली.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘युरोपात अमली पदार्थाचे सेवन अधिक केले जाते आणि त्यांनीही २००३ मध्ये असाच उपक्रम हाती घेतला. कल्पना नाही, हा योगायोग कसा जुळला. परंतु २००६ साली त्यांनी मला गाठले. भारतातही असाच उपक्रम सुरू आहे, याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी मला दक्षिण आफ्रिकेत नेले आणि तेथे गेल्यावर त्यांच्या ‘होमलेस फुटबॉल’ या उपक्रमाची माहिती मिळाली. त्याच वेळी अमेरिकेतील काही स्वयंसेवी संस्थांनी माझ्याबद्दल छापून आलेले वृत्तांत मुलाने वाचले. त्यानंतर त्याने माझ्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला.’’
‘स्लम सॉकर’ नामकरण, अन् गौरव
बारसे यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावरही होऊ लागल्यानंतर त्यांचा मुलगा अभिजित यांनीही भारतात परतण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘होमलेस फुटबॉल’ या संकल्पनेवर अभिजित यांनी झोपडपट्टी फुटबॉलचे नामकरण ‘स्लम सॉकर’ असे केले. त्यानंतर स्लम सॉकरचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू झाला. सुरुवातीला झोपडपट्टींच्या मुलांना व्यसनापासून रोखण्यासाठीच्या या प्रयत्नाला शिक्षणाची जोड देण्यास सुरुवात झाली. या मुलांना फुटबॉलच्या माध्यमातून शिक्षणही देण्याचा निर्णय अभिजित यांनी घेतला. अभिजित यांच्या ‘एज्यु किक’ उपक्रमातून फुटबॉलच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणही दिले जाते. त्यांच्या या उपक्रमाची दखल जागतिक फुटबॉल महासंघानेही घेतली आणि ‘फिफा’ने डाव्हर्सिटी पुरस्काराने त्यांचा गौरव केला.
‘फिफा’ने गौरवल्यानंतर आमच्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे. पण लहानशा रोपटय़ाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि यापुढे हा वटवृक्ष समाजात सकारात्मक ऊर्जेची छाया पसरवत राहील.
– विजय बारसे, संस्थापक, स्लम सॉकर
उपक्रम
१. प्रशिक्षकांचे प्रशिक्षण
२. आरोग्य शिबीर
३. प्रकल्प युवा स्टार
४. पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
५. एज्यु किक
६. युवा नेतृत्व प्रकल्प
७. महिला फुटबॉल विकास