फूटबॉलवेडय़ांची सध्या चर्चा सुरू आहे ती कॉन्फडेरशन कपची. पुढच्या वर्षी होणाऱ्या फूटबॉल विश्वचषक स्पर्धाची नांदी ठरणाऱ्या या स्पर्धेने तरुणाईवर सध्या गारुड केलं आहे.
फुटबॉल या खेळात असे काय आहे, की तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात हा खेळ फॉलो करतो ? क्रिकेटमध्ये कसं सगळं साधं सोपं आहे. ११-११ खेळाडूंचे दोन संघ. प्रथम फलंदाजी आणि त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठीची धडपड. अगदी कसं डोक्यात सहज शिरेल असं. फुटबॉलमध्ये खेळाडूंची संख्या वगळता इतर नियम डोकं खाजवायला लावणारे. आणि आत्ताचा फास्टफूड वाला तरुणवर्ग डोक्याला येवढा त्रास देण्यातला नक्की नाही..मग या खेळाची तरुणांत येवढी क्रेझ का? डोक्याला कष्ट पडतील असे काम टाळणारे हे युवक जलद कामाला नेहमी प्राधान्य देतात. म्हणून तर फास्त फूडचा धंदा नेहमी फायद्यात असतो. या फास्टफूड प्रवृत्ती मुळेच फुटबॉल युवकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ९० मिनिटांचा खेळ.. सामना महत्त्वाचा असला आणि निकाल हवाच असेल तर अतिरिक्त ३० मिनिटे अन्यथा पेनल्टी शूटआउटचा थरार आहेच. पण याही पलीकडे हा खेळ झटपट आहे. सहा – सहा तास टीव्ही समोर चिकटून राहण्यापेक्षा ९० मिनिटांचा हा खेळ कसा सोयीस्कर आहे. त्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सामने रात्री, मध्यरात्री किंवा पहाटे असे पहायचे असतात आणि युवकांना जागरणासाठी हे कारण पुरेसे आहेच. हा झाला त्यांच्या सोयीचा भाग, पण या खेळात असलेला वेग या युवांना आपल्या आयुष्यात झपाटय़ाने घडत असलेल्या घडामोडीसारखा वाटतो. फुटबॉल द्वेष करणारे किंवा क्रिकेटची झापड लावलेले म्हणतात की या कॉर्नरपासून ते त्या कॉर्नपर्यंत नुसते चेंडूला लाथ मारत पळणारा हा कसला खेळ. पण जगात केवळ १२ ते १५ देशांत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींना २०० देशांतील फुटबॉलची क्रेझ नाही कळणार.. दुर्दैवाने या अरसिक आणि क्रिकेटचे झापड लावलेल्यांमध्ये भारताचाही समावेश आहे. लहानपणापासून क्रिकेट पाहणाऱ्यांना फुटबॉलमधील वेगळेपण जाणवणारच नाही. १००-५० किंवा १३०-१०० यार्डाच्या मैदानावर ९० मिनिटे नुसतं न धावता, त्याला कौशल्याची साथ देण्याची किमया हा खेळ आपल्याला शिकवतो. त्वरित निर्णय घेण्याची क्षमता या खेळातून वाढते. त्यामुळेच युवकांवर या खेळाची मोहिनी आहे. युरो, ला लिगा, इंग्लिश प्रीमिअर लीग, बुंदेसलिगा, कोपा अमेरिका, विश्वचषक अशा स्पर्धाची मेजवानी या युवकांसाठी असते. सध्या तर कॉन्फेडरेशन चषक स्पर्धा पाहण्यात हे युवक व्यग्र आहेत. चिली, पोर्तुगाल आणि रशिया यंदा पहिल्यांदाच या स्पध्रेत खेळणार असल्याचे त्यांच्या फॉलोर्असची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, परंतु रशियाच्या चाहत्यांच्या पदरी निराशा आली. चिली आणि पोर्तुगालने उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने जेतेपदासाठीची काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. विश्वविजेता जर्मनी आणि मेक्सिको हेही जेतेपदाच्या शर्यतीत अव्वल चौंघात स्थान पटकावण्यात यशस्वी झाले आहेत.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा