देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटवरील चिंतेचे ढग अधिक गडद झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने हवाई वाहतूक स्थगित करून खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी स्वत: व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्यामुळे परदेशी खेळाडू हवालदिल झाले आहेत. परंतु परदेशी खेळाडूंना सुरक्षितपणे त्यांच्या देशात परतता येईल, अशी खात्री भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ताज्या निर्देशामुळे देशाबाहेरच राहावे लागेल, ही भीती अँड्र्यू टायला सतावत होती. त्यामुळे टायसह केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झम्पा यांनी सोमवारी ‘आयपीएल’ अर्धवट सोडून ऑस्ट्रेलियात परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर २४ तासांत ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमान वाहतुकीला १५ मेपर्यंत स्थगिती दिली आहे. ‘आयपीएल’ ३० मे रोजी संपणार असून, खेळाडूंना सुरक्षितपणे मायदेशी पोहोचवण्यासाठी आम्ही बांधील आहोत, असे लिखित आश्वासन ‘बीसीसीआय’ने परदेशी खेळाडूंना दिले आहे.

खेळाडूंनी परतीची व्यवस्था स्वत: करावी -पंतप्रधान मॉरिसन

मेलबर्न : ‘आयपीएल’मध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत: करावी, असे निर्देश ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी दिले आहेत. ‘‘खेळाडूंनी खासगी व्यवस्था करावी. कारण ‘आयपीएल’ म्हणजे राष्ट्रीय संघाचा दौरा नाही. त्यांनी प्रवासाची व्यवस्था स्वत: करावी आणि ऑस्ट्रेलियात परतावे,’’ असे मॉरिसन यांनी ‘दी गार्डियन’ वृत्तपत्रात म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने ‘थांबा आणि वाट पाहा’ हे धोरण स्वीकारले आहे. ‘‘भारतामधील कडक जैव-सुरक्षित वातावरणात होत असलेल्या ‘आयपीएल’मध्ये सहभागी झालेल्या खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचकांशी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची संघटना सातत्याने संपर्कात आहे,’’ असे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने म्हटले आहे.

लिनची ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडे विशेष विमान व्यवस्थेची मागणी

‘आयपीएल’ संपल्यानंतर मायदेशी परतण्यासाठी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने विशेष विमानाची व्यवस्था करावी, अशी मागणी मुंबई इंडियन्सचा फलंदाज ख्रिस लिनने केली आहे. पुढील आठवड्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे लसीकरण होणार आहे, ही माहितीसुद्धा त्याने दिली. सोमवारी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने त्यांच्या ‘आयपीएल’ खेळाडूंना आरोग्य आणि प्रवासाची योजना कळवण्याचे आवाहन केले. ‘आयपीएल’मधील साखळी सामने २३ मे रोजी आणि बाद फेरीचे सामने २८ मे रोजी संपतील, तर अंतिम सामना ३० मे रोजी होणार आहे. ‘‘आमच्या ‘आयपीएल’ करारातील १० टक्के रक्कम विशेष विमान प्रवासासाठी राखीव असते. त्यामुळे आम्ही ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडे विशेष विमानाची विनंती केली आहे.

खेळाडू घरी पोहोचेपर्यंत स्पर्धा संपलेली नसेल – ‘बीसीसीआय’

‘बीसीसीआय’ परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करीत असून, स्पर्धा संपल्यानंतर तुम्हाला मायदेशी पोहोचवण्यासाठी सरकारी विभागांशी सल्लामसलत करीत आहे. सर्व परदेशी खेळाडू आपल्या देशांत सुखरूपपणे पोहोचेपर्यंत आमच्यासाठी स्पर्धा संपलेली नसेल, असे ‘बीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमिन यांनी म्हटले आहे. ‘‘तुम्हाला ‘आयपीएल’ संपल्यानंतर घरी कसे परतता येईल, ही चिंता पडली आहे, याची आम्हाला जाणीव आहे. परंतु तुम्हाला काळजी करायची मुळीच आवश्यकता नाही. तुम्ही आपल्या ईप्सित स्थळी पोहोचावे यासाठी ‘बीसीसीआय’ सर्वतोपरी प्रयत्न करील,’’ असे अमिन यांनी सांगितले.

इंग्लंड क्रिकेट मंडळाकडून खेळाडूंना मार्गदर्शन

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेल्या इंग्लिश क्रिकेटपटूंच्या संपर्कात असून ते खेळाडूंना दरदिवशी मार्गदर्शन करीत आहेत. राजस्थान रॉयल्सच्या लियाम लिविंगस्टोनने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचे आणखीन काही खेळाडू माघार घेण्याच्या तयारीत आहेत का, हे ‘ईसीबी’ने स्पष्ट केलेले नाही. ‘‘आम्ही खेळाडूंशी वैयक्तिक स्तरावर चर्चा करत असून गरज पडल्यास त्यांना मार्गदर्शन करत आहोत. आम्ही भारतातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या खडतर काळातही आमचे विचार भारतीय जनतेच्या पाठीशी आहेत,’’ असे ‘ईसीबी’च्या प्रवक्त्याने सांगितले. ‘‘विलगीकरण आणि जैव-सुरक्षित वातावरणात राहणे खडतर असले तरी आम्ही जुळवून घेऊ,’’ असे कोलकाता नाइट रायडर्स आणि इंग्लंडचा कर्णधार ईऑन मार्गन याने म्हटले आहे.

ब्रेटली याच्याकडूनही करोनाविरुद्ध लढ्यासाठी आर्थिक मदत

नवी दिल्ली : पॅट कमिन्स याच्याकडून प्रेरणा घेत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज बे्रट ली याने भारताच्या करोनाविरोधातील लढ्यासाठी एक बिटकॉइन (अंदाजे ४० लाख रुपये) मदतीनिधीची घोषणा केली. सोमवारी कमिन्सने पंतप्रधान साहाय्यता निधीसाठी ५० लाख डॉलर्स मदत केली होती. ‘‘भारताला मी नेहमीच माझे दुसरे घर मानतो. भारतामधील रुग्णालयांना ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी मी एक बिटकॉइन मदतनिधी देत आहे,’’ असे ब्रेट ली याने सांगितले.

१४स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस (दिल्ली कॅपिटल्स), डेव्हिड वॉर्नर (सनरायजर्स हैदराबाद), ख्रिस लिन, नॅथन कल्टर-नाइल (मुंबई इंडियन्स), पॅट कमिन्स, बेन कटिंग (कोलकाता नाइट रायडर्स), डेन ख्रिस्तियन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स (रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु), मोझेस हेन्रिक्स, रीले मेरेडिथ, झाये रिचर्डसन (पंजाब किंग्ज), जेसन बेहरेनडॉर्फ (चेन्नई सुपर किंग्ज)

३६ केन रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा, अँड्र्यू टाय या तीन क्रिकेटपटूंनी माघार घेतल्यानंतर अद्याप ३६ जण ‘आयपीएल’मध्ये कार्यरत आहेत. यात १४ क्रिकेटपटू, ११ प्रशिक्षक, चार समालोचक, दोन पंच, पाच साहाय्यक मार्गदर्शक आणि एक ऑस्ट्रेलियन निवासी न्यूझीलंडचा समालोचक यांचा समावेश आहे.

परदेशी क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलिया  १४

वेस्ट इंडिज ७

दक्षिण आफ्रिका  ७

इंग्लंड ४

न्यूझीलंड   २

श्रीलंका  २

एकूण   ३६