बीसीसीआयच्या नियोजनामुळे खेळाडूंवरील ताण वाढत आहे. सातत्यापूर्ण मालिका खेळाडूंच्या कामगिरीवर परिणामकारक ठरु शकतात, असे सांगत भारताचा कर्णधार विराट कोहलीने खेळाडूंच्या विश्रांतीचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. आता याच मुद्द्यावर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर डिन जोन्स यांनी आपले मत मांडले आहे. भारतीय संघातील खेळाडूंनी क्रिकेटचा अतिरेक होत असल्याची तक्रार करणे गौण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भारतीय संघातील खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळतात. शिवाय ते मैदानात चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांनी विश्रांतीचा विचार करण्यापेक्षा मैदानात उतरणे अपेक्षित आहे.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डिन म्हणाले की, धोनी किंवा विराट यांची बाजू घेणे योग्य वाटत नाही. जर तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये असाल तर तुम्हाला मैदानात उतरावेच लागेल. मैदानात तुम्ही सहज धावा करत असाल. त्यामुळे संघाला फायदा होत असेल. तर तुम्ही संघाबाहेर राहण्याचा विचारच करु नये.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत खेळत आहे. पहिल्या दोन कसोटीनंतर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दिल्लीमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.