‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा : भारत यंदाही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार!

माजी बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांचे मत

माजी बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांचे मत

अन्वय सावंत, लोकसत्ता
मुंबई : गतविजेता भारत यंदाही ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार आहे. पुरुष गटात विश्वनाथन आनंदच्या पुनरागमनाचा भारताला फायदा होऊ शकेल, असे मत ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.

भारताने गतवर्षी रशियासह संयुक्तरीत्या ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यंदाच्या ऑलिम्पियाड स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. ऑनलाइन स्वरूपात होणारी ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारत आणि रशिया यांच्यातच चुरस असेल, असे ठिपसे यांनी नमूद केले.

‘‘भारताकडून यंदाही जेतेपदाची अपेक्षा आहे. भारतीय संघाची उत्तम संघनिवड करण्यात आली आहे. ऑलिम्पियाडमध्ये प्रत्येक देशाचे सर्वोत्तम पाच महिला आणि पाच पुरुष खेळाडू खेळणार आहेत. भारताचे विविध वयोगटांतील कनिष्ठ खेळाडू चांगली कामगिरी करत असतात. भारतीय खेळाडूंनी अनेकदा जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे. ऑलिम्पियाडमध्ये कनिष्ठ वयोगटाचाही समावेश असून ही गोष्ट भारताच्या पथ्यावर पडू शकेल. तसेच महिला गटातही भारताचे पारडे जड आहे. त्यामुळे भारताला रशिया, चीन आणि अमेरिका या बलाढय़ संघांवर सरशी साधता येऊ शकेल,’’ असे ठिपसे म्हणाले.

‘‘कोनेरू हम्पी आणि माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदच्या समावेशाने भारतीय संघाच्या सामर्थ्यांत भर पडली आहे. मात्र, रशियाला कमी लेखता येणार नाही. तसेच हिकारू नाकामुरा आणि वेस्ली सो यांच्यामुळे अमेरिकेचा संघही जेतेपदाचा दावेदार असेल,’’ असे विश्लेषण ठिपसे यांनी केले. यंदा भारताचा अव्वल विभागातील ‘ब’ गटात समावेश केला आहे. पी. हरिकृष्णा (प्राग), हम्पी (विजयवाडा) आणि द्रोणावल्ली हरिका (हैदराबाद) यांचा अपवाद वगळता भारताचे सर्व खेळाडू चेन्नई येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र राहून या स्पर्धेत खेळणार आहेत.

भारताचा संघ

विश्वनाथन आनंद, विदित गुजराथी, पी. हरिकृष्णा, बी. अधिबन, निहाल सरिन, कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका, तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी, आर. वैशाली, आर. प्रज्ञानंद आणि सविता श्री.

आम्ही सर्व खेळाडू एकाच हॉटेलच्या एकाच मजल्यावर राहात असल्यामुळे ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी आमच्या संघात खूप सकारात्मक वातावरण आहे. संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा उत्तम समन्वय आहे. आम्ही प्रत्येक फेरीवर लक्ष केंद्रित करून या स्पर्धेत यशस्वी कामगिरी बजावू, अशी मला आशा आहे.

-विश्वनाथन आनंद

 

भारताचे साखळी सामने

’  तारीख : ८ सप्टेंबर – वि. इजिप्त, फ्रान्स, स्वीडन

’  तारीख : ९ सप्टेंबर – वि. शेनझेन चायना, बेलारूस, हंगेरी

’  तारीख : १० सप्टेंबर – वि. हंगेरी, मोल्डोव्हा, स्लोव्हेनिया

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Former chess player pravin thipase opinion 2021 fide online chess olympiad zws

ताज्या बातम्या