भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह याची मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. सरदार सिंहसोबत पॅरालिम्पीकपटू देवेंद्र झाझरियाचं नावही या सर्वोच्च पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं आहे. हॉकी इंडियाने याआधीच सरदार सिंहचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी सुचवलेलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याव्यतिरीक्त क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, पॅरालिम्पीकपटू मिरअप्पन थंगवेलू, वरुण भाटी, गोल्फपटू एसएसपी चौरसिया यांच्यासह १७ खेळाडूंचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं आहे. या सर्व यादीवर अंतिम निर्णय हा क्रीडा मंत्रालयातर्फे घेतला जाणार आहे.

सरदार सिंह हा भारतीय हॉकीचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. सरदार सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला होता. कॉमनवेल्थ स्पर्धांमधलं रौप्यपदक तर वर्ल्ड हॉकी लिग स्पर्धेतलं कांस्यपदक भारताने सरदार सिंहच्या नेतृत्वाखालीच मिळवलं होतं. याचसोबत भारताने आशियाई खेळांमध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मात करत रिओ ऑलिम्पीकमध्ये थेट प्रवेश सरदार सिंहच्या नेतृत्वाखालीच मिळाला होता. याआधी सरदार सिंहला २०१५ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. याव्यतिरीक्त सरदारचा संघातील साथीदार एस.व्ही.सुनील याला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

देवेंद्र झाझरिया हा खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारा पहिला पॅरालिम्पीकपटू ठरेल. पुरस्कार विजेच्यांची निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने झाझरियाच्या नावाला आपली पसंती दर्शवली होती. रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देवेंद्रने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former hockey captain sardar singh and para olympic star devendra jhajariya recommended for khel ratna award
First published on: 03-08-2017 at 14:58 IST