टीम इंडियाचा माजी कर्णधार व बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली याला जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र मिळाले आहे. मेदिनीपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात भाग घेतल्यास जीवे मारण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. सौरव गांगुलीनेच याची माहिती दिली असून ७ जानेवारीला हे पत्र आपल्याला मिळाल्याचे त्याने सांगितले. याबाबत पोलीस आणि आयोजकांना सांगितल्याचे तो म्हणाला. येत्या १९ जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संघाद्वारे मेदिनीपूर विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु या कार्यक्रमात सामील होण्याबाबत अद्याप त्याने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गांगुली म्हणाला, कार्यक्रमात सहभागी होण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही. हा एक ‘लाइव्ह शो’ होणार आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमात जाणार की नाही तुम्हा सर्वांना समजेल असेही तो म्हणाला. बंगाल क्रिकेट संघटनेच्या बैठकीनंतर गांगुलीने याची माहिती माध्यमांना दिली. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत संघटनेने बैठकीचे आयोजन केले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौरव गांगुलीच्या कार्यालयात हे पत्र आले होते. जर तुम्ही मेदिनीपूर येथील कार्यक्रमात सहभागी झालात तर तुमच्या जीवितासाठी ते घातक ठरेल, असे पत्रात म्हटले आहे. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, गांगुलीला हे पत्र झेड अली नावाच्या एका व्यक्तीने दिले आहे. हा व्यक्ती कोण आहे. याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. त्याचबरोबर आशिष चक्रवर्ती यांना भेटायचे नाही, असेही पत्रात म्हटले आहे. आशिष चक्रवर्ती हे बंगाल क्रिकेट संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी आहेत.
सौरव गांगुली राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष बनल्यापासून राज्यात क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ते विविध प्रयत्न करत आहेत. त्यासाठी राज्यभरात ते विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. त्यासाठी ते विद्यापीठ, क्लब आणि राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये राज्य संघटनेच्या वतीने पुढाकार घेत आहेत.