रणजी स्पर्धेची एक-दोन नव्हे तर तब्बल चाळीस जेतेपद नावावर असणाऱ्या मुंबईला गतवैभव मिळवून देण्यासाठी चंद्रकांत पंडित यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंडित वांद्रे कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट संघटनेच्या इन्डोअर अकादमीचेही प्रशिक्षक असतील. मिलिंद रेगे वरिष्ठ निवडसमितीच्या अध्यक्षस्थानी असतील. या समितीत करसन घावरी, रवी ठाकेर आणि निशित शेट्टी यांचा समावेश आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि क्रिकेट सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विविध प्रशिक्षक आणि निवड समित्यांची घोषणा केली.
‘चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखील मुंबईने असंख्य रणजी जेतेपदे पटकावली आहेत. त्यांनी प्रशिक्षक म्हणून विविध स्तरांवर आपले कर्तृत्त्व सिद्ध केले आहे. मनुष्यबळ व्यवस्थापन आणि संघासाठी डावपेच आखण्यात पंडित माहिर आहेत’, असे वेंगसरकर यांनी सांगितले.
मुख्य प्रशिक्षकाच्या बरोबरीने फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षकाचीही लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former india wicketkeeper chandrakant pandit to coach mumbai ranji team
First published on: 01-07-2015 at 04:52 IST