भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा झाली असून भुवनेश्वर कुमार हा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी दिल्या जाणाऱ्या पॉली उम्रीगर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. मुंबईत २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.
भारताचे सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेंगसरकर यांनी १९७६ ते १९९१ दरम्यान भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता, बीसीआयचे हंगामी अध्यक्ष शिवलाल यादव आणि सचिव संजय पटेल यांच्या समितीने जीवनगौरव पुरस्कारासाठी वेंगसरकर यांच्या नावाची शिफारस केली. स्मृतिचिन्ह, चषक आणि २५ लाख रुपयांचा धनादेश, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
१९७५-७६च्या मोसमात इराणी चषक स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करताना शेष भारत संघाविरुद्ध शतक झळकावल्यानंतर वेंगसरकर खऱ्या अर्थाने चर्चेत आले. ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध तीन शतके झळकावणारे ते पहिले फलंदाज ठरले आहेत. भारतातर्फे १०० कसोटी सामने खेळणारे सुनील गावस्कर यांच्यानंतरचे ते दुसरे क्रिकेटपटू ठरले आहेत. आपल्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत वेंगसरकर यांनी १९८३ मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. वेंगसरकर यांनी ११६ कसोटी सामन्यांत ६८६८ धावा केल्या असून १२९ एकदिवसीय सामन्यांत त्यांच्या नावावर ३५०८ धावा जमा आहेत. १९८७ ते १९८९ दरम्यान १० कसोटी सामन्यांत वेंगसरकर यांनी भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले होते.
‘कर्नल’ म्हणून ओळखले जाणारे वेंगसरकर हे तीन वर्षे बीसीसीआयच्या गुणवत्ता संशोधन विकास समितीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर २००६ ते २००८ या काळात राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
२०१३-१४ काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून दिल्या जाणाऱ्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी भुवनेश्वर कुमारला चषक आणि पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवले जाणार आहे. मीरतच्या भुवनेश्वरने ११ कसोटी आणि ४२ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना रणजी क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाकडून शानदार कामगिरी केली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत हा सोहळा रंगणार आहे.
जम्मू आणि काश्मीरचा अष्टपैलू क्रिकेटपटू परवेझ रसूल रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. त्याने नऊ सामन्यांत ६६३ धावा आणि २७ बळी मिळवले आहेत. कर्नाटकला रणजी स्पर्धेचे जेतेपद मिळवून देणारा कर्णधार विनय कुमार हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला आहे.
केदार जाधव (१२२३ धावा) आणि रिषी धवन (४९ बळी) यांनी अनुक्रमे रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि बळी मिळवण्याचा पुरस्कार पटकावला आहे. स्मृती मंधना हिला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former indian batsman dilip vengsarkar set to receive bcci lifetime achievement award
First published on: 19-11-2014 at 02:22 IST