Kapil Dev On India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ येत्या १४ सप्टेंबरला आमनेसामने येणार आहेत. मात्र काही क्रिकेट चाहत्यांनी हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी देखील सामन्यावर बहिष्कार टाका असं म्हटलं आहे. मात्र याबाबतीत भारताच्या वर्ल्डकपविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांचं मत जरा वेगळं आहे. कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना सामना खेळण्यावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

आशिया चषक २०२५ स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेचे आयोजन दुबईत करण्यात आले आहे. भारत – पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती पाहता, दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळणं टाळताना दिसून येत आहे. कपिल देव यांनी क्रिकेट चाहत्यांना विनंती केली आहे की, हा सामना होऊ द्या. कारण दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध खेळायचं की नाही हा बीसीसीआय किंवा पीसीबीचा निर्णय नाही. तर हा निर्णय दोन्ही देशातील सरकारकडून घेण्यात आला आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या हवाल्याने कपिल देव म्हणाले, “ हा एक चांगला संघ आहे. पहिला सामना भारताने सहज जिंकला. मला विश्वास आहे ते ट्रॉफी जिंकून येतील. भारतीय संघाला मला एकच सांगायचं आहे, जिंकत रहा. खेळणं हे त्यांचं काम आहे आणि त्यांनी त्यावर लक्ष द्यावं. सरकार आपलं काम करेल, खेळाडूंनी आपण काम करावं.”

भारतीय संघाचा पहिला सामना यूएईविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. भारताने नाणेफेक जिंकून यूएईला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना यूएईचा संपूर्ण डाव अवघ्या ५७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने दिलेलं आव्हान ४.३ षटकात पूर्ण केलं. भारताकडून अभिषेक शर्माने ३० तर शुबमन गिलने नाबाद २० धावांची खेळी केली. भारतीय संघाचा पुढील सामना येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.