माजी कसोटीपटू व राष्ट्रीय कनिष्ठ क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष हेमंत कानिटकर यांचे दीर्घकालीन आजाराने येथे निधन झाले. मृत्युसमयी ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हृषिकेश व गोल्फपटू आदित्य ही दोन मुले असा परिवार आहे.
कानिटकर यांनी यष्टिरक्षक व फलंदाज म्हणून १९६३ मध्ये प्रथम दर्जाच्या कारकीर्दीस प्रारंभ केला. पदार्पणातच त्यांनी रणजी सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना सौराष्ट्राविरुद्ध शतक टोलविले होते. महाराष्ट्राला १९७०-७१ च्या मोसमात रणजी स्पर्धेत उपविजेतेपद मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. प्रथम दर्जाच्या कारकीर्दीत ८७ सामन्यांमध्ये त्यांनी ४२.७९ धावांच्या सरासरीने ५ हजारहून अधिक धावा केल्या. त्यामध्ये त्यांनी तेरा शतके टोलविली. राजस्थानविरुद्ध १९७०-७१ मध्ये एकाच डावात त्यांनी २५० धावा केल्या होत्या. ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. यष्टीमागे त्यांनी ८७ बळी मिळविले.
वेस्ट इंडिजविरुद्ध १९७४-७५ च्या मालिकेत त्यांना बंगलोर येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. पदार्पणाच्या डावात त्यांनी ६५ धावा केल्या होत्या. मात्र नंतर त्यांची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही त्यामुळे कानिटकर यांना केवळ दोनच कसोटींमध्ये संधी मिळाली. त्यांनी चार डावांत १११ धावा केल्या.
कानिटकर यांनी १९९६-९७ ते १९९८-९९ या कालावधीत राष्ट्रीय कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्षपदही भूषविले. महाराष्ट्र संघाचे कर्णधार, प्रशिक्षक, निवड समितीचे प्रमुख आदी विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे हाताळल्या.

कानिटकर यांच्या नेतृत्वाखाली खेळण्याचे भाग्य मला लाभले. सलामीला कशी फलंदाजी करावयाची हे त्यांच्याकडून मला शिकावयास मिळाले. कर्णधार असले तरी प्रत्येक खेळाडूला सतत सहकार्य करण्याची त्यांच्याकडे वृत्ती होती. ते व त्यांचे कुटुंबातील सर्व जण अनेक नवोदित खेळाडूंना मदत करीत असत. अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक व एकाग्रतेने खेळणारा खेळाडू असा नावलौकिक त्यांनी मिळविला होता.
-चेतन चौहान, माजी कसोटीपटू

रणजी व अन्य स्थानिक सामन्यांमध्ये कानिटकर यांनी माझ्या नेतृत्वाखाली अनेक सामने खेळले. तांत्रिकदृष्टय़ा अतिशय परिपक्व फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. सतत नवनवीन शिकण्याकडे त्यांचा कल असे. कलात्मक फलंदाजी करण्यातही त्यांचा हातखंडा होता. अँडी रॉर्बटस् याच्यासारख्या भेदक गोलंदाजाविरुद्ध पदार्पणातच त्यांनी अर्धशतक टोलविले होते. यातच त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण फलंदाजीचा प्रत्यय येऊ शकेल.
– चंदू बोर्डे, माजी कसोटीपटू

कानिटकर यांनी स्थानिक स्पर्धामध्ये आपल्या दिमाखदार खेळामुळे स्वतंत्र ठसा उमटविला. रणजी स्पर्धेत पंधरा वर्षे त्यांनी कारकीर्द गाजविली. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये निवड समितीवर काम करतानाही त्यांनी अनेक नैपुण्यवान खेळाडू भारताला मिळवून दिले. अनेक नवोदित व युवा खेळाडूंनी त्यांच्याकडून प्रेरणा घेत कारकीर्द यशस्वी केली.  
– अनुराग ठाकूर, बीसीसीआयचे सचिव

लेटकट फटके मारण्याबाबत, तसेच मागणीप्रमाणे षटकार खेचण्याची शैली त्यांनी विकसित केली होती. त्यांचा बहुमोल मार्गदर्शनामुळेच मी देखील चांगली कारकीर्द करू शकलो.
-मिलिंद गुंजाळ, माजी रणजीपटू

महाराष्ट्राच्या महान क्रिकेटपटूंमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ते सतत स्मरणात राहतील.  त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र क्रिकेट क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
– सुरेंद्र भावे, माजी क्रिकेटपटू