भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू रुसी फ्रामरोझ सुरती यांचे आज प्रदीर्घ आजाराने येथील स्थानिक रुग्णालयात निधन झाले. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले सुरती सध्या सुटी घालविण्यासाठी भारतात आले होते, परंतु काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका बसला होता. त्यामुळे त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती माजी क्रिकेटपटू नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी दिली.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर डिसेंबर १९६० मध्ये पाकिस्तानविरुद्ध सुरती यांनी कसोटी पदार्पण केले. त्यानंतर नोव्हेंबर १९६९ मध्ये बिल लॉरीच्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध आपल्या कारकीर्दीमधील (२६वा) अखेरचा सामना खेळून ते निवृत्त झाले. त्यांनी २८.७०च्या सरासरीने एकूण १२६३ धावा केल्या. १९६८-६९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी ९९ ही सर्वोच्च धावसंख्या
नोंदवली. सुरती यांनी नऊ अर्धशतके झळकावली आणि ४२ बळी घेतले. याचप्रमाणे २६ झेलही त्यांच्या नावावर आहेत.