माजी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू व प्रशिक्षक विजय गिरमे यांचे हृदयविकाराने येथे निधन झाले, ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मोठे बंधू तसेच माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू सुहास असा परिवार आहे.
विजय यांनी वरिष्ठ गटाच्या पाच राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविले होते. त्यांनी खुल्या राष्ट्रीय व अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धामध्ये सवरेत्कृष्ट खेळाडूचे अनेक वेळा पारितोषिक मिळविले. राज्य शासनाने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले होते. नूतन मराठी विद्यालय, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, आर्य क्रीडोद्धारक मंडळ (एकेएम) या संघांना त्यांनी अनेक स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळवून दिले. महाराष्ट्र बँकेत नोकरी करतानाही त्यांनी आंतरबँक स्पर्धामध्येही आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला. त्यांनी पुणे जिल्हा संघाचेही नेतृत्व केले. महाराष्ट्रात झालेल्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पंच व संघटक म्हणूनही त्यांनी यशस्वीरीत्या जबाबदारी सांभाळली. खेळाडू, प्रशिक्षक, पंच, तांत्रिक अधिकारी व संघटक आदी विविध भूमिकांद्वारे त्यांनी ४० वर्षांहून अधिक वर्षे व्हॉलीबॉल क्षेत्र गाजविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former volleyball player vijay girme passed away
First published on: 16-07-2015 at 02:06 IST