फॉम्र्युला-वन मोसमाची सुरुवात मार्च महिन्यापासून होणार असली तरी गेल्या महिन्यांपासूनच ड्रायव्हर्सना करारबद्ध करण्यासाठी सर्व संघांनी कंबर कसली होती. ब्रिटनचा फॉम्र्युला-वन ड्रायव्हर मॅक्स चिल्टन २०१४ मोसमातही मॉरूसिया संघासोबतच राहणार आहे. ज्युलेस बियांची याच्यासह तो मॉरूसिया संघाचे प्रतिनिधित्त्व करणार आहे, असे मॉरूसिया संघाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
२२ वर्षीय चिल्टनने गेल्या हंगामात ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. शर्यतीमध्ये पदार्पण केले. पहिल्याच हंगामात सर्व शर्यती पूर्ण करण्याची करामतही चिल्टनने साधली. ‘‘दुसऱ्या हंगामातही मॉरूसिया संघासोबत राहण्याचा निर्णय आनंददायी आहे. खेळाडू म्हणून मला तसेच संघालाही सातत्य महत्त्वाचे आहे. पहिल्या हंगामात अनेक गोष्टी शिकायला मिळतात. दुसऱ्या हंगामात तुमच्याकडून अपेक्षा वाढतात, क्षमतेनुसार खेळ करत अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर असते,’’ असे चिल्टनने सांगितले.
मॉरूसिया संघाचे व्यवस्थापक जॉन बूथ यांनीही चिल्टन संघात कायम असल्याने समाधान व्यक्त केले. ‘‘दोन्ही शर्यतपटू कायम राहणार असल्याने संघ व्यवस्थापनाला डावपेच रचताना फार बदल करावे लागणार नाहीत. चिल्टनने गेल्या वर्षी दमदार पदार्पण केले होते. यंदा तो या कामगिरीची पुनरावृत्ती करेल, अशी आशा आहे. कन्स्ट्रकटर्स (सांघिक) चॅम्पियनशिपमध्ये दहावे स्थान मिळवल्यानंतर या वर्षांसाठी आम्ही नवीन उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यादृष्टीने चिल्टन उपयुक्त ठरेल,’’ असे बूथ यांनी सांगितले.