आयपीएल २०२१ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेदरम्यान एका भारतीय क्रिकेटपटूला आनंदाची बातमी मिळाली. कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू हरभजन सिंगला मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. फ्रान्सची युनिव्हर्सिटी इकोल सुपीरियर रॉबर्ट डी सॉर्बोनेने दीक्षांत समारंभात हरभजनला क्रीडा क्षेत्रातील मानद पीएचडी प्रदान केली. हरभजन या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही, कारण तो सध्या आयपीएलच्या ‘बायो-बबल’ मध्ये आहे. विद्यापीठ क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मानद डॉक्टरेट प्रदान करते.

४१ वर्षीय हरभजन म्हणाला, ”जर एखादी संस्था आदर देत असेल तर तुम्ही तो अत्यंत विनम्रपणे स्वीकारता. जर मला विद्यापीठाची मानद क्रीडा डॉक्टरेट पदवी मिळाली असेल, तर याचे कारण मी क्रिकेट खेळतो आणि लोकांनी त्याबद्दल त्यांचे प्रेम आणि आपुलकी दिली आहे. ही पदवी मिळाल्याचा मला सन्मान आहे.”

हेही वाचा – IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरबाबत ‘मोठा’ खुलासा! मेगा ऑक्शनपूर्वी महत्त्वाची माहिती आली समोर

हरभजन सिंगचा कोलकाता संघ आयपीएल २०२१च्या प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. केकेआर ११ ऑक्टोबर रोजी आरसीबी विरुद्ध एलिमिनेटर सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. हरभजनला केकेआरने दोन कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. तो या हंगामात संघासाठी एकूण तीन सामने खेळला आहे. त्याने हे तिन्ही सामने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खेळले असून यामध्ये त्याला एकही विकेट मिळालेली नाही.

हरभजनची कारकीर्द

हरभजनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत भारतीय संघासाठी १०३ सामने खेळले आणि त्यात ४१७ विकेट्स मिळवल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २३६ सामन्यात २६९ विकेट्स घेतल्या आहे. २८ टी-२० सामन्यांमध्ये त्याने २५ विकेट्स घेतल्या आहेत.