सरावादरम्यान क्लार्क आणि वॉटसन यांच्यामध्ये अबोला
कर्णधार मायकल क्लार्क आणि उपकर्णधार शेन वॉटसन हे खरे तर शाळेपासूनचे मित्र. अनेच चढ-उतार त्यांनी पाहिले, बऱ्याच समस्या त्यांच्यापुढे आल्या, पण दोघांनीही समर्थपणे त्याला तोंड दिले. पण सध्याच्या हकालपट्टीच्या प्रकरणानंतर दोघांमध्ये विस्तवही जाताना दिसत नाही. शिस्तभंगाची कारवाई करत ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने वॉटसनची तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी हकालपट्टी केली होती. त्यानंतर ‘वयाच्या १२ वर्षांपासून माझी आणि वॉटसनची मैत्री आहे, त्यामुळे या प्रकरणाचा आमच्या मैत्रीवर परिणाम होणार नाही’ असे क्लार्क म्हणाला होता. पण बुधवारी सरावादरम्यान मात्र या दोघांमध्ये अबोला पाहायला मिळाला. त्यामुळे या हकालपट्टीचा परिणाम या दोघांच्या मैत्रीवर झाला असल्याचे बोलले जात आहे.
प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी वॉटसनसह चार खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई केली होती, पण जेव्हा वॉटसन सरावाला आला तेव्हा आर्थर यांनी त्याच्याशी संवाद साधला. क्लार्क संघाच्या डॉक्टरांचा उपचार घेत होता, तेव्हा वॉटसनने वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा सामना केला. जवळपास ३५ मिनिटे त्याने फलंदाजीचा सराव केला, पण त्यानंतर जेव्हा क्लार्क नेट्समध्ये आला तेव्हा वॉटसनने फलंदाजीचा सराव थांबवला. त्यानंतर वॉटसन याने आर्थर यांच्याशी संवाद साधला आणि या दोघांनी ग्लेन मॅक्सवेल आणि झेव्हियर डोहर्टी या दोघांना मार्गदर्शन केले. नेट्समधून वॉटसन निघाला हे पाहिल्यावर क्लार्क तिथे आला आणि त्याने खेळाडूंचा सराव पाहिला. सरावादरम्यान या दोघांनी एकत्र सराव करणे तर लांबच, पण या दोघांनी एकमेकांचे तोंडदेखील पाहिले नाही. यावरूनच या दोन जिवलग मित्रांमध्ये बिनसल्याचे सांगितले जात आहे.
पाठीच्या दुखापतीमुळे क्लार्क कदाचित चौथ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे, त्या वेळी वॉटसनच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडू शकते.
सध्याच्या घडीला वॉटसन हा आमचा कर्णधार नाही. पण जर क्लार्क चौथ्या कसोटी सामन्यात खेळला नाही तर कर्णधारपद वॉटसनला मिळू शकते. वॉटसन हा चांगला खेळाडू आणि त्याचबरोबर त्याच्याकडे चांगले नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे सलामीवीर इडी कोवन याने सांगितले.
दुखापतग्रस्त कर्णधार मायकल क्लार्कच्या दुखापतीबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला की, मी त्याच्याशी नुकताच बोललो. आमचा वैद्यकीय संघ त्याच्यावर मेहनत घेत आहे. तो चौथ्या कसोटी सामन्यामध्ये खेळेल किंवा नाही, याबद्दल काही सांगू शकत नाही. कारण प्रत्येक दिवशी त्याच्या दुखापतीवर उपचार होत असून तो त्यामधून कितपत सावरतो, हे पाहावे लागेल. त्याच्याबाबतचा निर्णय अद्याप घेतला जाणार नसून सामन्याच्यापूर्वीच त्याच्या संघसमावेशाबाबतचा निर्णय घेण्यात येईल. मालिकेत ३-० अशा पिछाडीवर असलो तरी चौथा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असेल, हा सामना जिंकून आम्ही मालिकेचा शेवट गोड करु इच्छितो.