Oman Cricket Team Journey, Asia Cup 2025: ओमान संघासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारत- पाकिस्तानसारखे नावाजलेले संघ ज्या स्पर्धेत खेळतात, अशा आशिया चषक स्पर्धेत आता ओमानचा संघ देखील खेळताना दिसणार आहे. ओमानचा पहिला सामना पाकिस्तानवरूद्ध सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून ओमानला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान कसा होता, ओमानचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास? जाणून घ्या.
ओमान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी जतिंदर सिंगकडे सोपवण्यात आली आहे. ओमानचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नवखा संघ आहे. त्यामुळे या संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू नाहीत. जतिंदर सिंगने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ओमानच्या खेळाडूंचा प्रवास कसा होता, याबाबत वक्तव्य केलं आहे.
जतिंदर सिंग म्हणाला, “क्रिकेटपेक्षा नोकरी मिळवण्याला इथे सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. ओमानच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलेले बहुतांश खेळाडू हे डेस्क जॉब करायचे आणि मिळालेल्या वेळात क्रिकेट खेळायचे. आता ओमानचा संघ देखील जागतिक स्तरावर आपला ठसा उसटविण्यासाठी सज्ज आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला, ” ज्यावेळी आम्ही सुरूवात केली, त्यावेळी आम्ही नोकरीला अधिक प्राधान्य दिलं. क्रिकेट हे आमच्यासाठी दुय्यम स्थानी होतं. बहुतांश मुलांनी ९ ते ५ ऑफिसमध्ये काम केलं आणि त्यानंतर क्रिकेट खेळण्याचं नियोजन केलं. पण आता माझं आशिया चषकात ओमान संघाचं नेतृत्व करण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. आमचा संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी खूप उस्तुक आहे.” असं जतिंदर सिंग म्हणाला.
ओमान संघातील खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानं उपलब्ध नव्हती. २०११ मध्ये त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी अनुकूल असं मैदान मिळालं. जतिंदर सिंगने जे स्वप्न पाहिलं होतं, ते आता सत्यात उतरलं आहे. ओमानचा संघ आशिया चषकात पाकिस्तानविरूद्ध आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या ओमानचा आशिया चषकातील पहिलाच सामना असणार आहे. त्यानंतर १५ सप्टेंबरला ओमानचा सामना यूएईसोबत आणि १९ सप्टेंबरला भारतीय संघाविरूद्ध होणार आहे. जर ओमानचा संघ सुपर ४ मध्ये पोहोचला, तर या संघाला आणखी ३ सामने खेळण्याची संधी मिळेल.