करोनामुळे फॉर्म्युला-वनमधील संघ आणि कारउत्पादक यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. यंदाच्या फॉर्म्युला-वन मोसमातील नऊ शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत अथवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या खेळातील संघ गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल महासंघाचे (फिया) अध्यक्ष जीन टॉड यांनी दिला आहे.

‘‘शर्यती रद्द करण्याचा सिलसिला अद्यापही कायम आहे. त्यामुळे आम्हाला यंदाच्या वेळापत्रकावर पुनर्विचार करावा लागणार आहे. सद्यस्थितीत फॉर्म्युला-वनसहित मोटारशर्यतींचे आयोजन हे महागडे होऊन बसले आहे. याबाबत आम्ही पावले उचलली असली तरी करोनामुळे हा खर्च भरून काढणे कठीण बनले आहे. त्यामुळे संघ आणि सहभागी कंपन्या गमावण्याची परिस्थिती उद्भवली आहे. यावर योग्य तोडगा काढण्याची गरज आहे,’’ असे टॉड यांनी सांगितले.

यंदाच्या २२ शर्यतींपैकी नऊ शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत अथवा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. १४ जून रोजी होणारी कॅनडा ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यत पुढे ढकलण्यात आली आहे. फॉर्म्युला-वन हा खेळ संकटात सापडला आहे. त्याचबरोबर किमान चार संघ फॉर्म्युला-वनमधून माघार घेतील, असा इशारा मॅकलॅरेन संघाचे प्रमुख झॅक ब्राऊन यांनी दिला आहे.

‘‘२०२० हे वर्ष सर्वासाठीच खडतर बनले आहे. इतकी वाईट परिस्थिती ओढवेल, याची कधी कल्पनाही केली नव्हती. आता यंदाची फॉर्म्युला-वन अजिंक्यपद स्पर्धा रद्द करावी का, याबाबत बोलण्याची ही वेळ नाही. काही कालावधीनंतरच आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ.’’