प्रशांत केणी

मिचेल मार्श, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू

मार्नस लबूशेन आता ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. तो जबाबदारीने संघाची सूत्रे सांभाळतो आणि कठीण परिस्थितीतून संघाला तारतो. त्यामुळे त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिचेल मार्शने व्यक्त केले आहे.

स्टीव्हन स्मिथला दुखापत झाल्यामुळे गतवर्षी अ‍ॅशेस कसोटी मालिकेत लबूशेनला ऑस्ट्रेलिया संघातून खेळता आले. या संधीचे त्याने सोने केले, असे मार्शने सांगितले. सध्या सोनी क्रीडा वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘बिग बॅश लीग’च्या निमित्ताने पर्थ स्कॉर्चर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मार्शशी या लीगसंदर्भात आणि ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीबाबत केलेली खास बातचीत-

* बिग बॅश लीगची तू ‘आयपीएल’शी कशी तुलना करशील?

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधील वातावरण आणि खेळपट्टय़ा हा या दोन स्पर्धामधील महत्त्वाचा फरक आहे. हाच अनुभव मग आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी उपयुक्त ठरतो. ‘आयपीएल’ ही जगातील पहिल्या क्रमांकाची ट्वेन्टी-२० लीग आहे, तर ‘बिग बॅश’ ही दुसऱ्या क्रमांकाची लीग म्हणता येईल. या दोन्ही स्पर्धामध्ये खेळणे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सन्मानजनक असते.

* ‘बिग बॅश लीग’ने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला काय दिले आहे?

२०११-१२ पासून सुरू झालेली ‘बिग बॅश लीग’ उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी ठरत आली आहे. २०१५-१६ पासून सुरू झालेल्या महिलांच्या ‘बिग बॅश लीग’चे यशसुद्धा कौतुकास्पद आहे. ऑस्ट्रेलियात आता ‘बिग बॅश लीग’ सर्व वयोगटांतील क्रिकेट रसिकांमध्ये रुजल्यामुळे खेळाच्या वाढीसाठी प्रेरक ठरत आहे.

* ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेकडे तू कसे पाहतो आहेस?

एकदिवसीय क्रिकेट प्रकारात पाच विश्वचषकजिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ट्वेन्टी-२० प्रकारात अद्याप एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही. परंतु ट्वेन्टी-२० प्रकारात ऑस्ट्रेलियाचा संघ अत्यंत बलाढय़ आहे. या वर्षी मायदेशात होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेकडे आम्ही गांभीर्याने पाहतो आहोत आणि विश्वविजेतेपदाचे दावेदारसुद्धा आहोत. ‘बिग बॅश’ आणि ‘आयपीएल’ यांच्यासारख्या लीगमधून खेळाडूंना या स्पर्धेच्या दृष्टीने पुरेसा सरावसुद्धा मिळेल.

* कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारांपैकी तुला सर्वात जास्त कोणता प्रकार आवडतो?

क्रिकेटचे हे तिन्ही प्रकार मला आवडतात आणि मी त्यात रमतो. वडील जेफ मार्श आणि भाऊ शॉन मार्श यांच्यामुळे आणि आमच्या कुटुंबातील क्रिकेटमय वातावरणामुळेच क्रिकेटचे हे तिन्ही प्रकार मला आवडतात.