खेळ हा खेळभावनेनेच खेळला जावा, असे म्हटले जाते. पण खेळाला धर्म मानले जाते आणि खेळाडूंना देव. त्यामुळे खेळाडूंच्या बाबतीत काही घडले तर चाहत्यांच्या भावना दुखावल्या जाणे स्वाभाविक असते. सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान कतारच्या महिला बास्केटबॉल खेळाडूंना हिजाब (डोक्याचा स्कार्फ) घालण्यास मनाई करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी भारतीय पुरुष खेळाडूंनाही चीनमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान पगडी किंवा पटका घालण्यास मज्जाव करण्यात आला होता. आता कतारच्या महिला खेळाडूंनी थेट स्पर्धेतूनच माघार घेतल्यामुळे ‘खेळ आणि धर्मभावना’ हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आशिया खंडातील देशांमध्ये खेळवण्यात येणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक मुस्लीम राष्ट्रे भाग घेतात. धर्मभावना दुखावल्या जातील, या हेतूने काही राष्ट्रांमध्ये महिलांना खेळण्याची परवानगी मिळत नव्हती. पण धर्मभावना, परंपरेची वेस ओलांडून महिला स्पर्धेत सहभागी होऊ लागल्या. कबड्डी, जिम्नॅस्टिक्स, ज्युदो, टेनिस, फुटबॉल यांसारख्या अनेक खेळांत मुस्लीम राष्ट्रांतील महिला खेळाडू हिजाब किंवा अंगभर कपडे घालून खेळू लागल्या. त्यांच्यासाठी काही आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांनी आपले नियम शिथिल केले. प्रतिष्ठेच्या स्पर्धासाठी आशियाई ऑलिम्पिक परिषद किंवा आशियाई क्रीडा संघटना महिला खेळाडूंना हिजाब, डोक्याला स्कार्फ तसेच पुरुष खेळाडूंना पगडी घालून खेळण्याची परवानगी देते. पण आशियाई क्रीडा स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमांनुसार खेळली जात असल्यामुळे त्यांच्याच नियमांचे पालन करावे लागते. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकसाठी सौदी अरेबियातून पात्र ठरलेली एकमेव महिला ज्युदोपटू वोजदान अली सेराज ब्दुलरहिम शारखानी हिला डोक्याला स्कार्फ बांधून स्पर्धेत खेळण्यास मज्जाव करण्यात आला होता, त्या वेळीही बराच वादंग माजला होता. मुस्लीम महिला खेळाडूंना डोक्याला स्कार्फ आणि व्यवस्थित कपडे घालून खेळण्याची परवानगी मिळावी, ही अट ठेवत सौदी अरेबियाने प्रथमच ऑलिम्पिकसाठी महिला खेळाडूंना पाठवले होते.
बास्केटबॉल या खेळात डोक्याचा संपर्क येत नसतो. पण आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाच्या नियमांनुसार, खेळाडूंना डोक्याला कोणतेही सुरक्षाकवच किंवा दागिने घालता येत नाहीत. पण ३ ऑन ३ प्रकारात पगडी किंवा हिजाब घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर केस बांधण्यासाठी ५ सेंमीचा रबरबँड वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण धार्मिक प्रथेप्रमाणे डोक्यावर पगडी, पटका किंवा हिजाब घालणाऱ्या शीख आणि मुस्लीम खेळाडूंनी या नियमांना विरोध दर्शवला होता.
कतारच्या खेळाडूंप्रमाणेच आता भारतीय बास्केटबॉलपटूंनाही पगडी घालून खेळता येणार नाही. पण यावर तोडगा म्हणून भारतीय बास्केटबॉल संघाचा कर्णधार अमरितपाल सिंग आणि अमज्योत सिंग या खेळाडूंनी कुटुंबीय आणि नातेवाइकांचा विरोध डावलून चक्क केस कापले आहेत. त्यामुळे शीख धर्माच्या प्रथेनुसार त्यांना आता पगडी किंवा पटका लावण्याची गरज भासणार नाही. देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी धर्मभावनेचीही तमा त्यांनी बाळगली नाही.
‘‘हिजाबवर बंदी असल्याचे आम्हाला माहीत आहे. पण आम्ही आमचा खेळ दाखवण्यासाठी येथे आलो होतो. आंतरराष्ट्रीय संघटनेला मात्र ते मान्य नाही,’’ ही कतारच्या महिला खेळाडूंची प्रतिक्रिया फारच बोलकी आहे. आता पुढील वर्षी या नियमांवर चर्चा केली जाणार आहे. कदाचित नियमांत सुधारणा केली जाईलही; पण धर्माचा आदर राखून खेळभावना जपणाऱ्या कतारच्या खेळाडूंना मात्र आशियाई स्पर्धेतून बाहेर पडावे लागले, ही खेदाची बाब आहे.