पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या डोक्यात चेंडू लागल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या जबड्याला सरावादरम्यान दुखापत झाल्याची घटना घडली. गॅरी कर्स्टन हे सध्या बिग बॅश लीगमधील होबार्ट हरिकेन या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. मैदानाचा काही भाग ओला असल्यामुळे होबार्ट हरिकेनचा संघ ब्लंडस्टोन अरेना येथे इनडोअर सराव करत होता. यावेळी होबार्ट हरिकेनचा धडाकेबाज फलंदाज डी आर्क शॉर्ट याने एक चेंडू जोरात फटकावला. हा चेंडू गॅरी कर्स्टन यांच्या दिशेने आला. कर्स्टन यांना वेळीच बाजूला होता आल्यामुळे चेंडू वेगाने त्यांच्या तोंडावर आदळला, अशी माहिती होबार्ट हरिकेनचा कर्णधार जॉर्ज बेली याने दिली. दरम्यान, या घटनेनंतर कर्स्टन यांच्यावर तातडीने दंत वैद्यकांकडून उपचार करण्यात आले. यावेळी कर्स्टन यांचे काही दात तुटल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार नाही.

डोक्यात बॉल लागल्याने पाकिस्तानचा खेळाडू मैदानात बेशुद्ध

तत्पूर्वी मंगळवारी सकाळी न्यूझीलंड- पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यातही एक दुर्घटना घडली. पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिक याच्या डोक्यात बॉल लागल्याने तो मैदानावर बेशुद्ध पडला. न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे मंगळवारी झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्याच्यावेळी हा प्रकार घडला. सामन्यातील ३२ व्या षटकात न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज मारा करत होते. त्यामुळे मलिक हेल्मेट न घालता मैदानात उतरला होता. यावेळी एक चोरटी धाव घेण्यासाठी मलिक धावला पण त्याचा साथीदार मोहम्मद हफीजने त्याला परत पाठवले. यावेळी पॉईंटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या कॉलीन मुनरोने मलिकला बाद करण्यासाठी स्टम्प्सच्या दिशेने चेंडू फेकला. मात्र, हा चेंडू क्रीझमध्ये परतत असलेल्या शोएब मलिकेच्या डोक्याच्या मागच्या बाजूला आदळला. चेंडू डोक्यात लागल्यानंतर शोएब मलिक लगेचच जमिनीवर कोसळला. त्यामुळे सर्वच खेळाडू आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. खेळाडू आणि डॉक्टरांनी मलिकच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर थोड्यावेळातच मलिक उभा राहिला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.