भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरवर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गंभीरला पुढील चार देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. विजय हजारे करंडक स्पर्धेत दिल्लीचे प्रशिक्षक भास्कर पिल्लई यांच्यासोबत गंभीरचा वाद झाला होता. यानंतर न्यायाधीश विक्रमजीत सेन यांच्याकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीने गंभीरला दोषी ठरवले. या समितीत मदन लाल, राजेंद्र राठोड आणि सोनी सिंह यांचा समावेश होता. मात्र या समितीने गंभीरवर घालण्यात आलेली दोन वर्षाची बंदी उठवली आहे. गंभीरवर घालण्यात आलेली ही बंदी २०१९ मध्ये संपुष्टात येणार होती.

तरुण खेळाडूंसाठी चांगले वातावरण दिले जात नसल्याचा आरोप विजय हजारे करंडक स्पर्धेदरम्यान गौतम गंभीरने केला होता. यानंतर डिडिसीएने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली. ‘समितीसमोर आलेल्या माहितीनुसार गंभीरला प्रशिक्षकांचा अपमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले,’ असे न्यायमूर्ती विक्रमजीत सेन यांनी म्हटले. ‘प्रशिक्षक पद अत्यंत सन्मानजनक असते. गंभीरच्या विधानामुळे संघातील खेळाडूंसमोर प्रशिक्षकांचा अपमान झाला. गंभीरने मुद्दामहून इतर खेळाडूंसमोर अशा प्रकारचे विधान केले,’ असेदेखील सेन यांनी म्हटले.

गौतम गंभीरला दोषी ठरवणाऱ्या समितीने आणखी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. खेळाडूंच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यानुसार सुधारणा करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली आहे. यासोबत शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी नियम तयार करण्याचीदेखील शिफारस करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते, याची कल्पना सर्वांना असावी, यासाठी ही शिफारस करण्यात आली आहे.