Glenn Maxwell Stunning Catch Video: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्याच टी-२० सामन्यात कांगारू संघाने १७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने चांगली कामगिरी केली. पण अखेरीस मॅक्सवेलने टिपलेल्या कमालीच्या झेलमुळे ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का झाला. मॅक्सवेलने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सूर्यकुमार यादवप्रमाणे अनोखा झेल टिपला. मॅक्सवेलने चेंडूवर लक्ष ठेवत सीमारेषेचा अचूक अंदाज घेत सूर्या दादासारखा टिपलेल्या झेलने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
मॅक्सवेलने दक्षिण आफ्रिकाविरूद्ध सामन्यात घेतलेल्या झेलची तुलना सूर्यकुमार यादवच्या वर्ल्डकप फायनलमधील झेलशी केली जात आहे. १० ऑगस्टला डार्विनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अष्टपैलू मॅक्सवेलने मात्र या सामन्यात रिकल्टनचा कमालीचा झेल टिपला.
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रायन रिकेल्टन उत्तम फॉर्ममध्ये होता आणि तो ७१ धावा करत खेळत होता. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २१ धावांची आवश्यकता होती आणि ऑस्ट्रेलियाला ३ विकेट्सची गरज होती. बेन ड्वारशुइसने पहिलाच डॉट बॉल टाकला. रिकल्टनने दुसऱ्या चेंडूवर लॉन्ग-ऑनच्या दिशेने एक मोठा फटका खेळला. चेंडू षटकारासाठी जात होता. तितक्यात मॅक्सवेलने हवेत झेप घेत चेंडू टिपला आणि मैदानावर पडण्यापूर्वी सीमारेषेच्या बाहेर चेंडू टाकला. यानंतर स्वत:ला सावरत तो सीमारेषेच्या आत गेला आणि चेंडू टिपला.
मॅक्सवेलने सीमारेषेजवळ झेल टिपत सूर्यादादाच्या कॅचची करून दिली आठवण
मॅक्सवेलचा झेल पाहून सर्वच चकित झाले होते. जणू काय मॅक्सवेलच्या पायाला स्प्रिंग असल्याप्रमाणे तो मैदानात झेपावला आणि शरीराचं संतुलन राखत त्याने चेंडू टिपला. यादरम्यान त्याने सीमारेषेचा अचूक अंदाजही घेतला. मॅक्सवेलच्या झेलचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सूर्यकुमार यादवने देखील टी-२० विश्वचषक २०२४ च्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम फेरीतील अखेरच्या षटकात डेव्हिड मिलरचा दमदार झेल टिपला. लॉन्ग ऑफवर सूर्यादादाने सीमारेषेजवळ अचंबित करणारा झेल टिपत भारताच्या वर्ल्डकप विजयाचा मार्ग सुकर केला.
मॅक्सवेलच्या झेलमुळे रिकल्टन ७१ धावांवर बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने नववी विकेट गमावली. रिकल्टन बाद झाल्याने आफ्रिकेच्या विजयाच्या आशा मावळल्या. यानंतर ड्वारशुईसने अखेरच्या चेंडूवर रबाडाला बाद केलं आणि ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा करत सर्वबाद झाला. ज्यामध्ये टीम डेव्हिडने मॅचविनिंग खेळी केली. टीमने ५२ चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांसह ८३ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १७० धावांचा पल्ला पार करून देण्यात मोठी भूमिका बजावली.