दैनंदिन आहारात लोणचे हा अविभाज्य घटक असतो. इंग्रजी भाषेत लोणच्याला ‘पिकल’ असे म्हणतात. या पिकलला चेंडूची साथ देऊन तयार करण्यात आलेला ‘पिकलबॉल’ हा खेळ आता क्रीडाविश्वात रुजू पाहत आहे. टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या तीन रॅकेटमय खेळांचे मिश्रण असलेल्या पिकलबॉलने देशभरात चांगलीच लय पकडली असून, मुंबईत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पध्रेत क्रीडारसिकांनी या स्पध्रेला उत्स्फूर्द प्रतिसाद दिला.
अमेरिकेतल्या सिएटलमध्ये १९६५मध्ये या खेळाचा जन्म झाला. जोन प्रिटचार्ड यांनी या खेळाचे ‘पिकलबॉल’ असे अनोखे नामकरण केले. त्यानंतर कॅनडा, सिंगापूर यांच्यासह भारतात या खेळाने पाय रोवले. महाराष्ट्रातील २२ जिल्हे राष्ट्रीय संघटनेशी संलग्न आहेत. सध्या शेर ए पंजाब जिमखाना अंधेरी, विलिंग्टन जिमखाना सांताक्रूझ आणि कामगार कल्याण केंद्र, एलफिन्स्टन येथे या खेळाचे प्रशिक्षण आणि सराव करता येऊ शकतो. लवकरच वांद्रे, दहिसर आणि ठाण्यातही या खेळासाठी केंद्र सुरू होणार आहे.
अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेचे संस्थापक आणि संचालक सुनील वालावलकर यांनी सांगितले की, ‘‘१९९९मध्ये कॅनडातील युथ एक्सचेंज कार्यक्रमाच्या वेळी या खेळाची ओळख झाली. त्यानंतर २००६ मध्ये सिनसिनाटी येथील टेनिस क्लिनिक कार्यक्रमादरम्यान टेनिसचे प्रशिक्षण घेताना पिकलबॉलची पुनर्ओळख झाली. भारतात परतल्यानंतर खेळाला संघटनात्मक बैठक देण्यासाठी प्रयत्न केले, मात्र धर्मादाय किंवा सोसायटी कायद्यान्वये मान्यता मिळण्यात अडचणी आल्याने कंपनी कायद्यांतर्गत अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेची स्थापना झाली.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘पिकलबॉल, टेनिस किंवा बॅडमिंटनला स्पर्धा नाही. शालेय स्तरावर या खेळाचा प्रसार झाला असून, नुकतेच राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या दहा खेळांमध्ये पिकलबॉलचा समावेश करण्यात आला आहे. तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी तसेच शरीराला सुरेख व्यायाम म्हणून तसेच मुख्य खेळांना पूरक म्हणून पिकलबॉल विकसित होत आहे.’’