महान हॉकीपटू आणि भारताचे सर्वोत्तम हॉकीपटू लेस्ली क्लॉडियस यांचे प्रदीर्घ आजारामुळे कोलकातात निधन झाले. यकृतासह अनेक इंद्रियांमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने रुग्णालयात न्यावे लागत होते. अखेर गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास वयाच्या ८५व्या वर्षी क्लॉडियस यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा त्यांचा परिवार आहे.
तीन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देण्यात क्लॉडियस यांनी मोलाची भूमिका बजावली होती. १९४८चे लंडन ऑलिम्पिक, १९५२चे हेलसिंकी ऑलिम्पिक आणि १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारताने रौप्यपदक जिंकले होते, त्यावेळी ते भारतीय संघाचे कर्णधार होते. हॉकीत सर्वाधिक ऑलिम्पिक पदके पटकावल्याबद्दल क्लॉडियस यांची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली होती. त्यांना १९७१मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी क्लॉडियस यांना कोलकातातील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांची तब्येत सुधारली होती, त्यामुळे बुधवारी त्यांना घरी जाण्याची परवानगी डॉक्टर देणार होते. पण गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.