पंजाबवर पाच विकेट्सने विजय; ब्राव्होचे चार बळी; सामनावीर फिंचचे तडफदार अर्धशतक
तिखट मारा करत ड्वेन ब्राव्होने पटकावलेले चार बळी आणि सामनावीर आरोन फिंचच्या तडफदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सने विजयी गर्जना केली. आपल्या पहिल्याच सामन्यात गुजरातने किंग्ज इलेव्हन पंजाबला पाच विकेट्सने पराभूत करत विजयी सलामी दिली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला मनन व्होरा (३८) आणि मुरली विजय (४२) यांनी ७८ धावांची सलामी दिली. रवींद्र जडेजाने या दोघांनीही बाद करत ही जोडी फोडली. दोन्ही सलामीवीर गमावल्यावर ब्राव्होच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दोन्ही सलामीवीरांनी दहाच्या सरासरीने धावा जमवल्या असल्या तरी ब्राव्होने त्यांच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोख बजावले. मार्कस स्टोइनिसने २२ चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर ३२ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळे पंजाबला १६१ धावा करता आल्या.
पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला पहिल्याच षटकात धक्का बसला. कर्णधार सुरेश रैनाही (२०) मोठी खेळी साकारू शकला नाही. पण दुसऱ्या बाजूने फिंचने पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली होती. एकटा फिंच पंजाबच्या गोलंदाजांवर तुटून पडत होता. स्टोइनिसच्या आठव्या षटकात स्ट्रेट ड्राइव्ह लगावत फिंचने अर्धशतक पूर्ण केले, पण यंदाच्या स्पर्धेतील पहिले शतक झळकावण्यात तो अपयशी ठरला. प्रदीप साहूने आपल्या लेग स्पिनवर चकवत फिंचला वृद्धिमान साहाकरवी यष्टीचीत केले. फिंचने ४७ चेंडूंत १२ चौकारांच्या जोरावर ७४ धावांची दमदार खेळी साकारली. फिंच बाद झाल्यावर दिनेश कार्तिकने २६ चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर नाबाद ४१ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद १६१ (मुरली विजय ४२, मनन व्होरा ३४; ड्वेन ब्राव्हो ४/२२, रवींद्र जडेजा २/३०) पराभूत वि. गुजरात लायन्स : १७.४ षटकांत ५ बाद १६२ (आरोन फिंच ७४, दिनेश कार्तिक नाबाद ४१; संदीप शर्मा १/२१)
सामनावीर : आरोन फिंच.